श्रीगोंदा: तरुणाईच्या बिघडत्या प्रवृत्तीमुळे शहरात गॅंगवॉरची भीती..! कधी लाठ्या/काठ्या, कोयत्याने हाणामारी, तर कधी हवेत गोळीबार..!

दिनांक २५ डिसेंबर २०२४, श्रीगोंदा:

श्रीगोंदा शहरात सध्या तरुणाईच्या बिघडत्या प्रवृत्तीमुळे गंभीर सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. रोजच होणाऱ्या किरकोळ वादातून हिंसक घटनांचे प्रमाण वाढत आहे. तरुणांमध्ये गटबाजी वाढल्याने श्रीगोंदा शहर बीडच्या मार्गाने जात असल्याची चिंता सर्वसामान्य नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. शहर गॅंगवॉरच्या उंबरठ्यावर असल्याचे बोलले जात असून, स्थानिक प्रशासन व पोलीस यंत्रणेला परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्वरीत कारवाई करण्याची गरज आहे.

काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेने शहरातील वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले आहे. एसटी स्टँड परिसरात एका २० वर्षीय युवकावर १५-२० जणांच्या टोळक्याने हल्ला केला. हल्ल्यातून बचावलेला युवक आपल्या समर्थकांसोबत परतला आणि हल्लेखोरांना धडा शिकवण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान दोन्ही गटांनी लाठ्या-काठ्या घेऊन गावभर बोभाटा केला.

दोन्ही गटांचे प्रमुख समन्वयासाठी समोरासमोर आल्यानंतर खरा वाद पेटला. वादाच्या भरात एका गटाने मिरची पावडर फेकून दुसऱ्या गटावर हल्ला चढवला. यानंतर लाठ्या, काठ्या आणि कोयत्यांचा वापर करत हाणामारी झाली. हल्ल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या एका व्यक्तीला अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेनंतर दोन्ही गटांमध्ये शीतयुद्ध सुरू असून, पुढे मोठा संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भरदिवसा झालेल्या गोळीबार व हाणामारीच्या घटनांमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.

या प्रकरणावर सामाजिक कार्यकर्त्यांनीही चिंता व्यक्त केली आहे. अशा अपप्रवृत्ती रोखण्यासाठी पोलीस यंत्रणेने तातडीने प्रतिबंधात्मक पावले उचलावीत, कायद्याचा धाक निर्माण करावा आणि शहरातील वातावरण स्थिर करण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

शहरातील अशा घटनांमुळे श्रीगोंदा गॅंगवॉरच्या काठावर उभे असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना आणि कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.

स्रोत:(अधिकृत माहितीनूसार)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading