दिनांक २६ जून २०२४, श्रीगोंदा:
श्रीगोंदा तहसील कार्यालयाच्या महसूल पथकावर वाळू तस्करांनी हल्ला केल्याची घटना दिनांक २२ जून २०२४ रोजी घडली. या घटनेतील आरोपी सागर बोरुडे याने महसूल पथकावर गंभीर आरोप केले आहेत. त्याने माध्यमांशी बोलताना सांगितले की, दोन टीपरचे ३० हजार आणि एका जीसीपीचे ५० हजार रुपये लष्करे नामक व्यक्तीमार्फत वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे त्याचे म्हणणे आहे.
घटनास्थळी जाऊन प्रशासनाची गाडी सुस्थितीत परत आली, मात्र पुढे या कर्मचाऱ्यांनी बेबनाव करून गाडीची काच फोडल्याचे बोरुडे सांगतो. सर्कल, बबलू नामक गाडीचा चालक, लष्करे आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यातील फोन संभाषण उघड केले पाहिजे, म्हणजे सर्व प्रकार समोर येईल, असेही तो सांगतो.
या कारवाईत नायब तहसीलदार दर्जाचा अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती, तसेच तलाठी यांना बोरुडे वगळता इतर आरोपींची नावे माहीत नसणे, यामुळे महसूलच्या कारवाईवर शंका निर्माण झाली आहे. ही कारवाई औपचारिक व कृत्रिम असल्याचे अनेकांचे मत आहे.
सागर बोरुडे याने सांगितले की, महसूल कर्मचाऱ्यांनी कारवाईची वेळ आल्याने गाडीवर दगड मारले आणि हा सर्व प्रकार तपसल्यास सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येईल. वाळू उत्खननासाठी महसूल यंत्रणेला पैसे देण्यात आल्याचे त्याचे म्हणणे आहे.
महसूल पथकावरील हल्ल्यानंतर सागर बोरुडे याच्यावर खुणाचा प्रयत्नसारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महसूल कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे तालुक्यातील कामकाज ठप्प झाले असून, १४ आरोपींना अटक केल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.
या घटनांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शालेय विद्यार्थ्यांचे दाखले, ज्येष्ठ नागरिकांचे प्रकरनं आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान ग्रस्त झालेल्या लोकांची पंचनामे रखडल्याने या लोकांमध्ये असंतोष पसरला आहे. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी अशी मागणी काही सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.
स्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)



