श्रीगोंदा: एसटी बसवर तरुणांचा हल्ला..

दिनांक २६ जुन २०२४, श्रीगोंदा:

आज सकाळी श्रीगोंदा/स्वारगेट एसटी पुण्यावरून श्रीगोंद्याकडे येत असताना वरवंड येथे महाविद्यालयीन तरुणी एसटीमध्ये चढल्या. त्यांच्या मागे काही तरुण देखील चढले. या वेळी एक तरुण दरवाजात उभा होता. एसटी वाहकाने त्याला दरवाज्यातून पुढे होण्यासाठी सांगितले, ज्यामुळे दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.

वाद वाढू नये म्हणून एसटी चालकांनी त्या तरुणाला खाली उतरण्याचा आणि मागच्या एसटीने येण्याचा सल्ला दिला. तो तरुण खाली उतरल्यानंतर, एसटी जेव्हा काष्टी येथे आली तेव्हा त्याने चार साथीदारांसह दोन दुचाकीवर एसटीचा पाठलाग केला.

काष्टीतील श्रीगोंदा चौकात एसटी थांबताच, हातात हॉकी स्टिक घेऊन आलेल्या तरुणांनी अचानक एसटीवर हल्ला केला. त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, परंतु तो न उघडता आल्यामुळे, चालकाच्या दरवाज्यावर हॉकी स्टिकने मारत दरवाजा उघडण्यास सांगितले. चालकाने दरवाजा न उघडल्याने तरुणांनी एसटीच्या समोरच्या बाजूने दगडफेक केली.

या हल्ल्यात एसटीचे मोठे नुकसान झाले. एसटीत महिला प्रवासी देखील होत्या, परंतु सुदैवाने कोणताही प्रवासी जखमी झाला नाही. दगडफेक करून, तरुणांनी तिथून पळ काढला.

या घटनेनंतर दोषींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळाने या हल्ल्याचा निषेध केला असून, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अधिक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

स्रोत:(आगार व्यवस्थापक)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading