दिनांक ११ ऑक्टोबर २०२४, दौंड/श्रीगोंदा:
दौंड शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १० ऑक्टोबर रोजी रात्री पावणे नऊ ते रात्री साडेअकराच्या सुमारास लिंगाळी गावच्या हद्दीत मंगेश मेमोरियल हायस्कूल समोरील मोकळ्या जागेत धारदार शस्त्राने वार करून एका व्यक्तीचा निर्घृण खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे दौंड शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
खून झालेल्या व्यक्तीचे नाव अमोल सुभाष साळुखे (वय-३३, रा. बोरावकेनगर, दौंड) असे आहे. त्यांच्या पत्नी तेजश्री अमोल साळुखे यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार, पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली आणि मयत अमोल यांचा व्यावसायिक भागीदार महेश गणेश काळे (वय-३३, रा. अजनुज, श्रीगोंदा) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल हे रात्री साडेदहापर्यंत घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या पत्नी व मामाने त्यांचा शोध घेतला असता, लिंगाळी गावच्या हद्दीत ते आपल्या कारमध्ये गंभीर जखमी अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)




