दिनांक २२ ऑक्टोबर २०२४, श्रीगोंदा:
महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार श्रीगोंदा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे (आयटीआय) नामकरण ‘श्री संत शेख महंमद महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे करण्यात आले आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन थाटात पार पडले, ज्यात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा नामांतर सोहळा साजरा झाला.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीगोंदा तालुक्याचे आमदार बबनराव पाचपुते, शेख महंमद बाबा दर्गाह ट्रस्टचे ट्रस्टी राजू भाई शेख, अजिजभाई शेख, यात्रा कमिटीचे सदस्य पोपट आबा खेतमाळीस आणि गोपाळ मोटे पाटीलसह अवधूत राऊत, चंदन घोडके व सतीश बोरुडे हे उपस्थित होते. या मान्यवरांनी आपल्या भाषणांतून शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले व समाजातील धार्मिक ऐक्य व शांततेचा महत्त्वाचा संदेश दिला.
अजीज भाई शेख यांनी आपल्या भाषणात संत शेख महंमद महाराजांच्या कार्याचे स्मरण करून, त्यांचे नाव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला देण्यात आल्याने विशेष आनंद व्यक्त केला. त्यांनी असेही म्हटले की, या नामांतरामुळे संत महंमद महाराजांचे शांती व सहिष्णुतेचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील आणि संस्थेला एक नवीन ओळख प्राप्त होईल.
यात्रा कमिटीचे सदस्य गोपाळ मोटे पाटील व पोपट आबा खेतमाळीस यांनीही आपल्या मनोगतातून शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले. त्यांनी सांगितले की, संतांच्या कार्याचा आदर्श घेवून शिक्षण क्षेत्रात प्रगती होत राहावी, यासाठी या निर्णयाने प्रेरणा मिळेल.
कार्यक्रमाचे अध्यक्ष बबनराव पाचपुते यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नामांतर हा केवळ एक टप्पा आहे, अजूनही अनेक प्रकल्प पूर्ण करण्याची गरज आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या, ज्यात त्यांनी तांत्रिक शिक्षणाचे महत्त्व आणि आधुनिक कौशल्ये आत्मसात करण्यावर भर दिला.
याप्रसंगी आयटीआय मधील प्राचार्य सोमनाथ जाधव, शिक्षक वृंद, तसेच सामाजिक कार्यकर्ते सतीश बोरूडे, अवधूत राऊत, राजेंद्र उकांडे, घोडके सर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्रोत:(आयोजीत कार्यक्रम)




