पंढरीच्या पांडुरंगाच्या दिंडी निधीतील भ्रष्टाचार करणाऱ्या दोषी ग्रामसेवकांना तात्काळ बडतर्फ करा; गटविकास अधिकाऱ्यांचीही पुन्हा चौकशी करा,
– शामभाऊ जरे

जून २०२५ मध्ये पंढरपूर येथे जाणाऱ्या पायी दिंडी वारीसाठी शासनाकडून देण्यात आलेल्या निधीमध्ये झालेला भ्रष्टाचार हा केवळ आर्थिक गैरव्यवहार नसून लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धास्थान असलेल्या पंढरीच्या पांडुरंगाचा आणि वारकरी संप्रदायाच्या भावनांचा केलेला विश्वासघात आहे. या प्रकरणातील दोषींना अद्याप अभय दिले जात असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर संशय निर्माण झाला आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शामभाऊ जरे यांनी केला आहे.

संभाजी ब्रिगेडने केलेल्या तक्रारीनंतर जिल्हा परिषद स्तरावर चौकशी समिती नेमण्यात आली होती. या चौकशीमध्ये संबंधित ग्रामसेवकांनी आर्थिक अनियमितता व नियमबाह्य कामकाज केल्याचे स्पष्टपणे निष्पन्न झाले. चौकशी समितीने दोषींवर कारवाई करण्याच्या शिफारशी करूनही सहा महिन्यांहून अधिक कालावधी उलटला असताना अद्याप कोणतीही कठोर कारवाई झालेली नाही. त्यामुळे दोषींना जाणीवपूर्वक संरक्षण दिले जात आहे का, असा प्रश्न जनतेसमोर उभा राहिला आहे.

या संपूर्ण प्रकरणात संबंधित गटविकास अधिकाऱ्यांच्या मंजुरीने खर्चाचे आकडे फुगविण्यात आल्याचा संशय असून खर्चातील मोठ्या तफावतीकडे प्रशासनाने हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले आहे. निधी वितरण, मंजुरी आणि खर्च पडताळणी प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका असलेल्या अधिकाऱ्यांना चौकशीच्या कक्षेबाहेर ठेवणे म्हणजे सत्य दडपण्याचा प्रयत्न असल्याची भावना जनतेमध्ये निर्माण झाली आहे.

पंढरीच्या वारीसारख्या पवित्र धार्मिक परंपरेसाठी शासनाने दिलेल्या निधीवर डल्ला मारणाऱ्या व्यक्तींना कोणतीही दया दाखवू नये. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना सेवेत ठेवणे म्हणजे भ्रष्टाचाराला अधिकृत संरक्षण देण्यासारखे आहे. त्यामुळे संबंधित दोषी ग्रामसेवकांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात यावे आणि गटविकास अधिकाऱ्यांसह संपूर्ण प्रकरणाची नव्याने उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

प्रशासनाने यापुढेही वेळकाढूपणा केल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा शामभाऊ जरे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading