दिनांक १२ जून २०२६,श्रीगोंदा:
तालुक्यातील पिसोरेखांड येथून एक अत्यंत थरारक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या डाळिंबाच्या शेतात फिरत असलेल्या एका ७१ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षकाची निर्घृण हत्या करण्यात आली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोपटराव रावजी गावडे (वय ७१) असे खून झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकाचे नाव आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पोपटराव गावडे हे नेहमीप्रमाणे आपल्या डाळिंबाच्या शेतात फेरफटका मारत होते. याच दरम्यान एका विकृत स्वभावाच्या व्यक्तीने जुन्या किंवा अज्ञात कारणावरून त्यांच्यावर अचानक जीवघेणा हल्ला केला. संशयित आरोपीने गावडे यांच्या डोक्यात खोऱ्याच्या दांड्याने अत्यंत जबर प्रहार केले. हा वार इतका भीषण होता की, यामध्ये पोपटराव गावडे यांचा जागीच मृत्यू झाला.
एका सन्माननीय आणि सेवानिवृत्त शिक्षकाचा अशा प्रकारे निर्घृण खून झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच पिसोरेखांड आणि संपूर्ण श्रीगोंदा तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
तात्काळ कारवाई: घटनेची माहिती मिळताच श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असून, घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.
या प्रकरणातील मुख्य संशयित नेमका कोण आहे आणि हत्येमागचा मूळ हेतू काय होता, याचा सखोल तपास श्रीगोंदा पोलीस करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार सदरील घटना जमिनीच्या वादातून घडल्याचे बोलले जात आहे.
स्रोत:(अधिकृत माहिती)
