अहिल्यानगर:
भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, अहिल्यानगर जिल्ह्यात दिनांक ०८/०६/२०२६ ते दिनांक ०९/०६/२०२६ या कालावधीत तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून जिल्ह्यासाठी “येलो अलर्ट” जारी करण्यात आला असून, जिल्हा प्रशासनाने सर्व नागरिकांना काळजी घेण्याचे व आवश्यक ती दक्षता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
प्रशासनातर्फे नागरिकांच्या सुरक्षेसाठी खालीलप्रमाणे महत्त्वाच्या सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत:
विजेपासून बचाव आणि सुरक्षा: मेघगर्जना होत असताना किंवा वीज चमकत असताना झाडांखाली अथवा झाडांजवळ उभे राहू नये. सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या “दामिनी (Damini)” ॲपचा वापर करून विजेच्या अंदाजाबाबत माहिती घ्यावी.
विद्युत उपकरणांचा वापर टाळा: वादळादरम्यान कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटरसायकल किंवा सायकल यांसारख्या वाहनांपासून दूर राहावे.
खुल्या जागांवर काळजी घ्या: मोकळे मैदान, टॉवर्स, ध्वजांचे खांब, धातूचे कुंपण आणि ट्रान्सफॉर्मरजवळ थांबू नये. जर तुम्ही मोकळ्या जागेवर असाल आणि आश्रयासाठी जागा नसेल, तर जमिनीशी कमीत कमी संपर्क येईल अशा पद्धतीने गुडघ्यावर बसून, हाताने कान झाकावे आणि डोके दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये घ्यावे.
अपघात टाळा: जाहिरात फलक (होर्डिंग्स) कोसळून होणारे अपघात टाळण्यासाठी वादळाच्या वेळी त्यांच्या आजूबाजूला थांबू नये.
पर्यटन आणि जलाशय क्षेत्रांत बंदी: धरण, नदी किंवा कालव्यांच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये. पर्यटनस्थळी किंवा कोणत्याही धोकादायक ठिकाणी ‘सेल्फी’ काढण्याचा मोह टाळावा.
शेतकरी आणि जनावरांची सुरक्षा: वादळी वारा, पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच नियोजन करावे. बाजारात आणलेला किंवा साठवलेला शेतीमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. तसेच, पाळीव जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवावे.
आपत्कालीन संपर्क यंत्रणा:
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी नजीकचे पोलीस स्टेशन किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथील ०२४१-२३२३८४४ / २३५६९४० किंवा टोल फ्री क्रमांक ११२ आणि १०७७ वर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे
