अजब प्रकार: श्रीगोंद्यात अमरधाममधून मृत महिलेची ‘खोपडी’ गायब; अघोरी पूजेच्या संशयाने खळबळ..

दिनांक १२ जून २०२६,श्रीगोंदा:

श्रीगोंदा शहरातील अमरधाम (स्मशानभूमी) येथे एक अत्यंत धक्कादायक आणि अजब प्रकार समोर आला आहे. दोन दिवसांपूर्वी अंत्यविधी झालेल्या एका ५८ वर्षीय मृत महिलेच्या चितेमधून चक्क ‘खोपडी’ (कवटी) आणि पायांचे अवशेष गायब झाल्याचे उघडकीस आले आहे. घटनास्थळी अघोरी पूजेचे साहित्य आढळून आल्याने परिसरात जादूटोण्याच्या संशयाने मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंदू घिसाडी समाजातील एका ५८ वर्षीय महिलेचा डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे मृत्यू झाला होता. दोन दिवसांपूर्वी त्यांच्यावर अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. हिंदू घिसाडी समाजाच्या परंपरेनुसार, मृतदेहाला अग्नी दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी ‘सावडण्याचा’ (अस्थी गोळा करण्याचा) कार्यक्रम केला जातो.

या परंपरेनुसार, अंत्यविधीच्या दुसऱ्या दिवशी नातेवाईकांनी स्मशानभूमीत येऊन पाहिले असता, चितेमध्ये जळालेले अवशेष आणि हाडांचा ढाचा व्यवस्थित होता, ज्यामध्ये मृतदेहाची खोपडीही सुरक्षित असल्याचे त्यांनी पाहिले होते.

आज (१२ जून) सकाळी जेव्हा नातेवाईक आणि समाजबांधव सावडण्याच्या मुख्य विधीसाठी अमरधाममध्ये पोहोचले, तेव्हा त्यांना तिथे पाहताच मोठा धक्का बसला. दुसऱ्या दिवशी दिसलेली मृतदेहाची खोपडी (कवटी) आणि पायांचे अवशेष तिथून गायब होते. धक्कादायक बाब म्हणजे, त्याच चितेच्या ठिकाणी सायाळाचे काटे, कणकीच्या पिठाच्या बाहुल्या आणि लिंबू ठेवून अघोरी पूजा करण्यात आल्याचे निदर्शनास आले. यावरून रात्रीच्या वेळी येथे कोणीतरी जादूटोणा केल्याचा संशय बळावला आहे.

या संतापजनक आणि अघोरी प्रकारानंतर मृत महिलेच्या मुलाने आणि संतप्त नातेवाईकांनी तात्काळ श्रीगोंदा पोलीस स्टेशन गाठले. “जोपर्यंत पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत नाहीत आणि दोषींना पकडत नाहीत, तोपर्यंत अस्ति सावडण्याचा  कार्यक्रम करणार नाही,” असा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.

या विचित्र आणि गंभीर घटनेमुळे श्रीगोंदा शहरात भीतीसह उलटसुलट चर्चांना उधाण आले असून, या अघोरी कृत्यामागचा छडा लावण्याचे आव्हान श्रीगोंदा पोलिसांसमोर आहे.

स्रोत:(अधिकृत माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading