गर्भलिंग निदान प्रकरण: श्रीगोंदा तालुक्यातील मेडिकल चालकाला अटक, कारसह सोनोग्राफी मशीन जप्त

दिनांक ८ जून २०२६ श्रीगोंदा:

गर्भलिंग निदान चाचणी आणि अवैध गर्भपात प्रकरणातील मुख्य गुन्ह्यात लोणी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात श्रीगोंदा येथील एका मेडिकल चालकाला अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने शनिवारी अटक केली. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव जालिंदर बोरुडे (वय ४० वर्षे, रा. घोगरगाव, ता. श्रीगोंदा) असे आहे. तो घोगरगाव येथे मेडिकल चालवत होता. या रॅकेटमध्ये त्याचा थेट सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणात झालेली ही ११ वी अटक आहे.

यापूर्वी याच गुन्ह्यात पुणे येथून अटक करण्यात आलेला मेडिकल साहित्याचा घाऊक विक्रेता नरेंद्र ठाकरे याची पोलिसांनी कसून चौकशी केली होती. ठाकरे हा अवैध लिंगनिदान चाचणीसाठी लागणारी यंत्रसामग्री (मशीन) पुरवत असल्याचे समोर आले होते. चौकशीदरम्यान ठाकरेने मेडिकल चालक जालिंदर बोरुडे याच्या सहभागाबद्दल माहिती दिली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांची पथके मागील दहा दिवसांपासून बोरुडेच्या शोधात होती आणि अखेर शनिवारी त्याला बेड्या ठोकण्यात आल्या.

पोलिसांनी आरोपी जालिंदर बोरुडे याच्याकडून बेकायदेशीर लिंगनिदानासाठी वापरण्यात येणारे सोनोग्राफी मशीन आणि त्याची कार जप्त केली आहे.

या रॅकेटचा पर्दाफाश करताना पोलिसांनी आतापर्यंतच्या तपासात अतिशय महत्त्वाची कामगिरी केली आहे: अवैध गर्भलिंग निदान चाचणीसाठी वापरण्यात येणारी एकूण ५ सोनोग्राफी मशीन्स वेगवेगळ्या ठिकाणांवरून जप्त करण्यात आली आहेत.
गुन्ह्यात वापरण्यात आलेली ४ वाहने देखील पोलिसांनी ताब्यात घेतली असून, त्यांची कसून तपासणी सुरू आहे.

स्रोत (ऑनलाईन वृत्त)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading