दिनांक १२ जून २०२६ श्रीगोंदा:
श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे अकार्यक्षम पोलीस निरीक्षक (PI) किरण शिंदे यांची अखेर अहिल्यानगर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गत असलेल्या ‘अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट’ (AHTU) मध्ये बदली करण्यात आली आहे.
शिंदे यांच्या कार्यकाळातील वाढती गुन्हेगारी, कायदा व सुव्यवस्थेचा उडालेला बडगा आणि अवैध धंद्यांना मिळालेले अभय यामुळे श्रीगोंदा तालुक्यात प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. अखेर त्यांची बदली झाल्याने श्रीगोंदकरांनी सुटकेचा निश्वास सोडला असून, शहर व परिसरात नागरिकांकडून या बदलीचे जोरदार स्वागत केले जात आहे.
पीआय किरण शिंदे यांच्या कार्यकाळात श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले होते. त्यांच्या संशयास्पद आणि ढिसाळ कारभारामुळे तालुक्यात
तालुक्यात मागासवर्गीय समाजावरील अन्याय आणि अत्याचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली होती. पीडितांना न्याय मिळवून देण्यात पोलीस प्रशासन सुस्त असल्याचे चित्र होते.
शहर व ग्रामीण भागात घरफोड्या, चोऱ्या आणि दुचाकी चोरीच्या घटनांचे प्रमाण चरम सीमेवर पोहोचले होते. यामुळे व्यापारी आणि सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.
मटका, जुगार, बेकायदेशीर गावठी दारू आणि प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक व विक्री पीआय शिंदे यांच्या नाकाखाली उघडपणे सुरू होती. स्थानिक पोलिसांचे या धंद्यांना मूकसंमती असल्याचा आरोप जनतेतून सातत्याने होत होता.
स्थानिक पातळीवर वारंवार तक्रारी करूनही पीआय किरण शिंदे यांनी अवैध धंद्यांकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली. अखेर या प्रकरणाची गंभीर दखल घेत अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी श्रीगोंदा पोलिसांवर विसंबून न राहता, आपल्या ‘विशेष पथकाला’ (SP Squad) थेट कारवाईचे आदेश दिले.
पोलीस अधीक्षकांच्या विश्वासातील पथकाने श्रीगोंदा हद्दीत एकापाठोपाठ एक छापेमारी करत लाखो रुपयांचा गुटखा, दारू आणि इतर अवैध धंदे उद्ध्वस्त केले. स्थानिक पोलिसांचे अपयश आणि पीआय शिंदे यांची निष्क्रियता या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यासमोर उघडी पडली होती. तेव्हापासूनच शिंदे यांच्या हकालपट्टीची टांगती तलवार त्यांच्यावर होती.
किरण शिंदे यांची अखेर अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट (AHTU) मध्ये रवानगी करण्यात आली आहे. ही बातमी श्रीगोंद्यात वाऱ्यासारखी पसरताच सर्वसामान्य नागरिक, व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले.
स्रोत:(अधिकृत माहिती)
