श्रीगोंदा पोलीस दलाची बदनामी करण्याचा कट.? ‘त्या’ तक्रारीत तथ्य नसल्याचा पोलीस निरीक्षकांचा दावा..!

दिनांक १० एप्रिल २०२६,श्रीगोंदा:

श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने उपोषणकर्त्या महिलेला धमकी दिल्याच्या आरोपावरून सध्या तालुक्यात उलट-सुलट चर्चा सुरू आहे. मात्र, या प्रकरणाला आता एक नवे वळण मिळाले असून, पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हा केवळ पोलीस प्रशासनाची आणि प्रामाणिक कर्मचाऱ्यांची बदनामी करण्याचा जाणीवपूर्वक केलेला कट असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.

या प्रकरणाबाबत अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक किरण शिंदे म्हणाले की, ज्या तक्रार अर्जाचा दाखला देऊन आरोप केले जात आहेत, तसा कोणताही अर्ज संबंधित महिलेने दिलेला नाही, असे खुद्द तक्रारदारानेच मान्य केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, प्रशासनाकडे उपलब्ध तक्रार अर्जात तक्रारदार महिलेचे नावही चुकीचे नमूद करण्यात आले आहे. यावरून हे स्पष्ट होते की, काही समाजकंटक पोलीस कर्मचाऱ्याला लक्ष्य करून प्रशासनाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत आहेत.

आता या प्रकरणात पोलीस तपासात आणि निरीक्षकांच्या खुलाशानंतर या तक्रारीच्या सत्यतेवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या मते, पोलीस कर्मचाऱ्यावर झालेले आरोप निराधार असून, पोलीस प्रशासनावर दबाव टाकण्यासाठी किंवा कर्मचाऱ्याला वैयक्तिक कारणावरून त्रास देण्यासाठी हा बनाव रचला गेल्याचा संशय आहे. या प्रकरणातील तांत्रिक बाबी आणि नावातील चुकांमुळे तक्रारीची विश्वासार्हता संपली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या संपूर्ण प्रकारामुळे श्रीगोंदा पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. एकीकडे आत्मदहनाचा इशारा दिला असतानाच, दुसरीकडे तक्रारदाराने अर्जच दिला नसल्याचे मान्य केल्यामुळे या प्रकरणामागील खरा ‘मास्टरमाइंड’ कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या पोलीस प्रशासन या बदनामीच्या कटाचा खोलवर तपास करत असून, अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

स्रोत:(अधिकृत माहिती)

टीप:(AI मार्फत फोटो तयार करण्यात आला आहे..)

Leave a Reply