दिनांक १४ एप्रिल(विसापूर,श्रीगोंदा:
सद्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लोक घरात बसले असताना एका बहाद्दराला वाळू चोरीची लहर आली. मात्र लागलीच पोलिसांनी त्याला हेरले.अर्थात नेहमीप्रमाणे आरोपी पळून गेला आणि आठ लाखाचा जेसीबी यंत्र पोलिस घेऊन आले आहेत.
श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर गावच्या शिवारात शिंदे मळा परिसरातील हंगा नदी पात्रातील ही वाळू चोरी पोलिसांनी पकडली आहे.पोलिस कर्मचारी प्रकाश बारवकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सचिन सोपान जठार, रा. विसापूर ता.श्रीगोंदा याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा आरोपी विसापूर गावच्या शिवारात हंगा नदीच्या पात्रात वाळू उपसा करून वाळू चोरी करण्याचा प्रयत्न करताना दिसून आला. परंतु गणवेशातील पोलिसांना पाहून जेसीबी जागेवरच ठेवून पळून गेला वगैरे मजकूरचे फिर्याद देण्यात आली आहे.
(वार्तांकन-नितीन रोही)
