दिनांक २५ मार्च,मुंबई :
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर २४ मार्च रोजी मंत्रालयात मुख्य व उपमुख्य सचिवांसोबत बैठक पार पडली. त्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी पोलिस संचारबंदीच्या नावाखाली मारत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
आपल्यातील काही लोक बातम्या व अफवांवर विश्वास ठेवून खूप मोठी गर्दी करत आहेत. वास्तविक शेतकऱ्यांचा तयार झालेला माल आणणं व तो ग्राहकापर्यंत पोचवणं, जीवनावश्यक वस्तू पोचवणं यामध्ये सरकार बारकाईने लक्ष देत आहे. परंतु कधी कधी पोलीस विभागातील अधिकारी दिसेल त्याला मारत आहेत. वास्तविक अत्यावश्यक सेवा पुरविणारा जो कर्मचारी आहे, व्यापारी आहे त्यांना त्रास होता कामा नये अशा सूचनाही अजित पवार यांनी केल्या.
यावेळी श्रीगोंदा येथील व मराठवाडा येथून तक्रारी आल्या आहेत. असं करून सर्वांचेच नुकसान होत आहे. संचारबंदी आहे. गर्दी कमी करायची आहे. १४४ कलम लावण्यात आले आहे. पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र यायचं नाही. उगाचंच घर सोडायचं नाही. अत्यावश्यक असेल त्यांनीच तेवढया पुरते बाहेर पडून घरात परत यायचं आहे. काळजी घ्यायची ही सरकारची भूमिका आहे. अनेक लोकं पाळण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र,काही सुशिक्षित वर्गच बाहेर पडत आहे. हे थांबलं पाहिजे. असेही अजित पवार म्हणाले.
(वृत्तसंस्था)
