मढेवडगाव ता.श्रीगोंदा येथील विविध कार्यकारी सेवा संस्थेने गेल्या सहा वर्षांपासून देवस्थान वर्ग-३ जमीनीवर तत्कालीन माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक व त्याच्या एकत्रित कुटुंबाला लाखो रुपयांचे बोगस पिककर्ज,मध्य व दीर्घ मुदत गृहकर्ज दिल्या प्रकरणी व सहाय्यक निबंधक कार्यालयापुढे केलेल्या उपोषण वेळी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्या मुळे तसेच वेळोवेळी मागणी करूनही जिल्हा बँक या बोगस कर्जाची माहिती देत नसल्यामुळे, संस्थेचे कर्जदार सभासद सोमवार दि.२ मार्च रोजी आमरण उपोषणास बसणार आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक भीमराव फरकांडे व त्याच्या चार भावांनी सचिवाशी संगनमत करून,”देवस्थान वर्ग-३” जमीनीवर खोटे कागदपत्रे तयार करून व पदाचा गैरवापर करीत लाखो रुपयांचे वेगवेगळ्या प्रकारचे बनावट कर्जे घेतले आहेत. संस्थेच्या सुज्ञ कर्जदार सभासदांच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर,त्यांनी गेल्या दोन वर्षांपासून वेळोवेळी या कर्ज प्रकरणाची सहाय्यक निबंधक सहकारी संस्था व जिल्हा बँकेकडे पाठपुरावा केला.
दि.६ जानेवारी रोजी सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेपुढे केलेल्या उपोषणात दिलेल्या लेखी आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे व जिल्हा सहकारी बँकेने बनावट कर्ज कागदपत्रे देण्याचे टाळाटाळ करत असल्यामुळे,एकत्र कुटुंबात थकबाकी असूनही बोगस वसूल दाखवून इ करार न करताही,संस्थेचा थकबाकीचा बोजा असतानाही,दहा गुंठे क्षेत्र करण्यास तुकडा बंदी कायदा असतानाही कामगार तलाठी यांनी दिलेल्या पत्राच्या आधारे झालेली खातेफोड व पुन्हा पुन्हा बोगस कर्ज याची चौकशी न झाल्यामुळे व सचिव,अध्यक्ष व संचालक मंडळ यांनी केलेल्या सहा वर्षांपासून बोगस कर्ज व गैर कारभार विरुद्ध बँकेने कुठलीही दखल घेतलेली नाही.त्यामुळे कर्जदार सभासद उपोषण करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
निवेदनावर अंबादास सोनबा मांडे, साहेबराव मुकींदा उंडे, दिलीप गेना मांडे, राजेंद्र ज्ञानदेव शिंदे संदीप विश्वनाथ मांडे, संतोष दादा मांडे, राजेंद्र संभाजी उंडे यांच्या सह्या आहेत.