खडकवासला येथे भरधाव कारचा भीषण अपघात; ४ वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू.. श्रीगोंद्यातील चालकावर गुन्हा दाखल.

दिनांक १७ मे २०२६,खडकवासला/श्रीगोंदा:

खडकवासला गावात एका भरधाव कारने सहा दुचाकी आणि एक रिक्षा, अशा एकूण सात वाहनांना धडक दिली. या अपघातात एका 4 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला असून, 3 ते 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. बेजबाबदार चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हा अपघात झाला.

यशराज नीलेश कांबळे (वय 4, रा. अभिनव कॉलेज रोड, नहे), असे या अपघातात मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. याप्रकरणी कारचालक अमोल गोरक्षनाथ गेगडे (वय 32, रा. राजापूर, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) आणि त्याचा साथीदार प्रकाश तात्याराम कोठारे (वय 32, रा. होलेवाडी, राजगुरुनगर, ता. खेड) यांनी नांदेड सिटी पोलिसांनी घेतले आहे.

गेगडे आणि कोठारे हे दोघे कारने खडकवासला धरण भागाकडे चालले होते. ते खडकवासला गावात आले असता गेगडे यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि त्याने रस्त्यावरील सहा दुचाकी आणि रिक्षाला धडक दिली. त्यानंतर कार थेट रस्त्याच्या विरुद्ध बाजूच्या असलेल्या दुकानात घुसली. कारच्या धडकेमुळे दुचाकी आणि रिक्षाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या अपघातात यशराज कांबळे हा चिमुरडा गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला तातडीने सिंहगड रोडवरील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मात्र, उपचार सुरू असतानाच सायंकाळी पावणेसातच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. अपघातातील जखमीचे नावे कळू शकली नाही. अपघातानंतर पोलिसांनी कारचालक गेगडे आणि त्याचा साथीदार कोठारे यांना ताब्यात घेतले आहे. वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्यांना पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच नांदेड सिटी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अपघाताचा पंचनामा केला. आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. नांदेड सिटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल भोस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास सुरू आहे.

स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading