दिनांक १७ मे २०२६, श्रीगोंदा:
तालुक्यातील शेडगाव (रसाळ मळा) येथे वृद्ध दांपत्याला तलवार व लाठीने मारहाण करून लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराला श्रीगोंदा पोलिसांनी अवघ्या ६ तासांत बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत एका मुख्य आरोपीसह त्याच्या अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
शेडगावच्या ग्रामस्थांनी आणि पोलीस पथकाने ऊसाच्या शेतात संयुक्त मोहीम राबवून ही
यशस्वी कामगिरी केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेडगाव (रसाळ मळा) येथील रहिवासी हिराबाई ज्ञानदेव केदारी (वय ७५ वर्षे) यांनी रविवारी (दि. १७ मे) सायंकाळी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शनिवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास हिराबाईंचे पती ज्ञानदेव केदारी हे घराच्या पडवीत झोपलेले असताना, दोन अनोळखी इसमांनी त्यांच्यावर लाकडी काठी आणि तलवारीने जीवघेणा हल्ला केला. त्यांना जबर जखमी करून आरोपींनी त्यांच्या खिशातील रोकड आणि मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला होता. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांत जबरी चोरी आणि आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
रविवारी सकाळी या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींकडून मिळालेली माहिती आणि गोपनीय सूत्रांकडून आलेल्या माहितीच्या आधारे, हा गुन्हा राज्या सायट्या पवार याने त्याच्या अल्पवयीन मुलासह केल्याचे निष्पन्न झाले. आरोपी शेडगाव परिसरातील एका मोठ्या उसाच्या शेतात लपल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली.
पोलीस निरीक्षक शिंदे यांनी वेळ न घालवता स्थानिक ग्रामस्थांना मदतीचे आवाहन केले. पोलीस पथक आणि शेडगावच्या नागरिकांनी मिळून उसाचे संपूर्ण क्षेत्र वेढा देऊन पिंजून काढले. सलग ६ तास चाललेल्या या थरारक शोधमोहिमेनंतर आरोपी राज्या पवार आणि त्याच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
ही धडक कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, कर्जत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे, पोलीस हेडकॉन्स्टेबल संभाजी शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल महादेव कोहक, संदीप राऊत, सचिन वारे, अमोल मरकड आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल बबन साळवे यांच्या पथकाने केली.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या नियंत्रणाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय वाघमारे आणि पोलीस कॉन्स्टेबल शरद गावडे करत आहेत. अवघ्या ६ तासांत आरोपींना गजाआड केल्याबद्दल श्रीगोंदा पोलीस आणि शेडगावच्या नागरिकांचे कौतुक होत आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
