दिनांक १७ मे २०२६, श्रीगोंदा:
दौंड-नगर रोडवरील काष्टी टोल नाक्यावर रविवारी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अनेक वाहनचालकांना तासन्तास टोल प्लाझावर थांबावे लागल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले.
याच दरम्यान एका नागरिकाने टोलवरील वाहतूक कोंडी आणि नागरिकांना होत असलेल्या त्रासाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रीत करत टोल कर्मचाऱ्यांना जाब विचारला. मात्र, यावेळी संबंधित नागरिक आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचे समोर आले आहे. वाद वाढल्यानंतर त्या नागरिकाला धक्काबुक्की करून टोल परिसरातून हाकलून देण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. “वाहनचालकांना सुविधा देण्याऐवजी दमदाटी केली जात आहे का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच संबंधित टोल कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, इतका मोठा गोंधळ होऊनही पोलीस प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप केला नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. वाहतूक कोंडी नियंत्रणात आणणे, नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे आणि टोल व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असताना प्रशासन निष्क्रिय असल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे.
स्थानिक नागरिकांनी काष्टी टोल नाक्यावर वाहतूक व्यवस्थापन सुधारावे, अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी आणि अशा घटनांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
स्रोत:(ऑनलाईन माहिती)














Leave a Reply