श्रीगोंदा तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; येळपणे येथून ३ लाख १३ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त, दोन आरोपींवर गुन्हा दाखल..

दिनांक २४ मे २०२६,अहिल्यानगर:

जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्री व सेवन करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कडक मोहीम उघडली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथे धडक कारवाई करत ३.१३७ किलो ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ७८,००० रुपये किमतीचा गांजा जप्त केला असून, या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पथक बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करत होते. दरम्यान, पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, येळपणे (ता. श्रीगोंदा) येथील रहिवासी दादा साहदु दिघे हा त्याच्या राहत्या घरी गांजा विक्रीच्या उद्देशाने अंमली पदार्थ बाळगून आहे.

माहिती मिळताच पथकाने बेलवंडी पोलीस स्टेशनचे सपोनि नंदकुमार सोनवालकर व त्यांच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन येळपणे शिवारातील दादा दिघे याच्या घरावर छापा टाकला. घराची झडती घेतली असता, एका पिशवीत हिरवट रंगाचा पाला, फुले, बोंडे आणि बिया असलेले गांजा सदृश्य अंमली पदार्थ मिळून आले. पोलिसांनी दादा सहादु दिघे (वय ७९ वर्ष) याला ताब्यात घेतले आहे.


ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे अधिक चौकशी केली असता, हा गांजा त्याने गौतम कुमार यादव (रा. बडगाव शिंदोडी, ता. जि. अहिल्यानगर, मूळ रा. देसपूर माझी, जि. पाटना, बिहार) याच्याकडून विक्रीसाठी आणल्याचे कबूल केले. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायदा (NDPS Act) कलम ८ (क), २० (ब) ii (ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार श्यामसुंदर जाधव, मनोज साखरे, चालक उत्तरेश्वर मोराळे तसेच बेलवंडी पोलीस ठाण्याचे सपोनि नंदकुमार सोनवालकर, भाऊसाहेब यमगर आणि कैलास सिपनकर यांच्या संयुक्त पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास बेलवंडी पोलीस करत आहेत.


अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोठेही अंमली पदार्थांची बेकायदेशीर खरेदी किंवा विक्री सुरू असल्यास, नागरिकांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेच्या ०२४१-२४१६१११ या क्रमांकावर किंवा डायल ११२ वर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading