बोरबांय… उरुळी कांचन पोलिसांची धडाकेबाज कारवाई! सोरतापवाडीत भर पहाटे किराणा दुकान फोडणारी वाघोली-खराडीतील तिघांची टोळी गजाआड..

दिनांक २४ मे २०२६ उरुळी कांचन (पुणे):

भर पहाटेच्या सुमारास एका किराणा दुकानाचे शटर लोखंडी हत्याराने कापून गल्ल्यातील सुमारे ३० हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेणाऱ्या तीन अट्टल चोरट्यांच्या टोळीला उरुळी कांचन पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. घटना घडल्यानंतर अवघ्या काही तासांतच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:
१. अजय युसुफ मौजन (वय २२, रा. गोकुळ पार्क, फेज-१, राधाकृष्ण मंदिरामोर, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे)
२. सुमित सुनील बोराटे (वय १९, रा. लेन नं. ६, श्री बालाजी पीजी, खराडी, पुणे)
३. ऋषिकेश बिभीषण शिर्के (वय १९, रा. बकोरी फाटा, माउली पार्क, लोणीकंद, ता. हवेली, मूळ रा. मढे वडगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांना अटक केली आहे.

याप्रकरणी फिर्यादी नरेन्द्र पुम्माभाई देसाई (वय २३, धंदा- किराणा दुकान, सध्या रा. सोरतापवाडी फाटा, बालाजी दुकानाच्या पाठीमागे ता. हवेली जि. पुणे, मूळ रा. गेला, ता. लखणी, जि. बनासकांठा, राज्य गुजरात) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र देसाई यांचे सोरतापवाडी हद्दीतील कडवस्ती येथे ‘बालाजी ट्रेडर्स’ नावाचे किराणा दुकान आहे. शुक्रवारी पहाटे साडेचार ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास आरोपींनी दुकानाचे शटर लोखंडी हत्याराने कापून आत प्रवेश केला.

दुकानात शिरल्यानंतर त्यांनी गल्ल्यात ठेवलेली ३० हजार रुपये रोख रक्कम चोरून पोबारा केला होता. सकाळी नेहमीप्रमाणे दुकान उघडल्यानंतर चोरीचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

चोरीची माहिती मिळताच फिर्यादी नरेंद्र देसाई यांनी तात्काळ उरुळी कांचन पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या (Technical Analysis) आधारे तपास करत पोलिसांनी अवघ्या काही तासांतच यातील तीन आरोपींचा माग काढून त्यांना अटक केली.

अटक करण्यात आलेले आरोपी हे वाघोली, खराडी आणि लोणीकंद परिसरातील असून त्यांनी सोरतापवाडी भागात येऊन या घरफोडीचा कट रचला होता. त्यांनी परिसरात अशा प्रकारे आणखी काही चोऱ्या केल्या आहेत का, याचा सखोल तपास उरुळी कांचन पोलीस करत आहेत.

भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हास दाखल या कारवाईनंतर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(४), ३०५ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

स्रोत:(ऑनलाइन वृत्त)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading