भानगावच्या भूमिपुत्राचा मान उंचावला! आयपीएस धनंजय कुलकर्णी यांची अतिरिक्त पोलिस आयुक्तपदी नियुक्ती..

दिनांक २१ मे २०२६,श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव गावचे भूमिपुत्र तथा महाराष्ट्र पोलिस दलातील अनुभवी आयपीएस अधिकारी धनंजय कुलकर्णी यांची मुंबई पोलिस दलाच्या पूर्व प्रादेशिक विभागाच्या अतिरिक्त पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या बढतीमुळे श्रीगोंदा तालुक्यासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

धनंजय कुलकर्णी यांनी कृषी शाखेतील पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर सन १९९८ मध्ये पोलिस उपअधीक्षक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. आपल्या कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि धाडसी कार्यशैलीमुळे त्यांनी अल्पावधीतच पोलिस प्रशासनात वेगळी ओळख निर्माण केली. विविध संवेदनशील आणि महत्त्वाच्या पदांवर काम करताना त्यांनी उत्कृष्ट नेतृत्वाची छाप उमटवली आहे.

सध्या ते मुंबई विशेष शाखेत अप्पर पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखणे, गुप्त माहिती संकलन तसेच सुरक्षा व्यवस्थापनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यापूर्वी त्यांनी मुंबई पोलिस दलातील विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या असून, दहशतवादविरोधी पथकातही उल्लेखनीय सेवा बजावली आहे.

रत्नागिरी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून काम करताना त्यांनी गुन्हेगारी नियंत्रणासोबत जनतेशी सुसंवाद वाढवण्यावर भर दिला. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सेनेत आणि इंटरपोलसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांमध्येही त्यांनी काम करून भारतीय पोलिस सेवेचा गौरव वाढवला आहे.

नक्षलग्रस्त भागातील धाडसी आणि प्रभावी कामगिरीबद्दल त्यांना विशेष सेवा पदक तसेच राष्ट्रपती पोलिस पदकाने गौरविण्यात आले आहे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभव, प्रशासनातील पकड आणि उत्कृष्ट कार्यक्षमतेची दखल घेत राज्य शासनाने त्यांच्यावर मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहरातील अतिरिक्त पोलिस आयुक्तपदाची जबाबदारी सोपवली आहे.

धनंजय कुलकर्णी यांच्या या यशामुळे श्रीगोंदा तालुक्यातील युवकांसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला असून, ग्रामीण भागातूनही जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर उच्च पदापर्यंत पोहोचता येते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

स्रोत:(ऑनलाइन वृत्त)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading