दिनांक २० मे २०२६, श्रीरामपूर:
‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ अंतर्गत शेतकऱ्यांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल असलेले आरोपी संदीप चंद्रकांत बनकर यांना श्रीरामपूरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायालयाने काही अटी व शर्ती घालत बनकर यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
फिर्यादी संदीप राऊत यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दिली होती. त्यानुसार, आरोपींनी आपल्याकडे विविध सौर पंप कंपन्यांची एजन्सी असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले होते. शासकीय शुल्काव्यतिरिक्त जास्तीचे पैसे घेऊन शेतकऱ्यांना सौर पंपाचे अर्ज मंजूर करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते.

सुरुवातीला काही पंप मंजूर झाल्यामुळे शेतकऱ्यांचा त्यांच्यावर विश्वास बसला. त्यानंतर श्रीरामपूर, वैजापूर आणि कन्नड भागातील सुमारे ४० शेतकऱ्यांनी आपले अर्ज आणि लाखो रुपये आरोपींकडे सुपूर्द केले.
मात्र, या अर्जांमध्ये आधीच वापरलेले ग्राहक क्रमांक वापरण्यात आल्याचे महावितरणच्या तपासणीत उघड झाले. यामुळे महावितरणने हे अर्ज ब्लॉक केले आणि शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

अटक टाळण्यासाठी संदीप बनकर यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. त्यांच्या वतीने ॲड. एस. के. भोस यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद केला.
फिर्यादीने आरोपी संदीप बनकर यांना थेट कोणतेही पैसे दिलेले नाहीत. सर्व ऑनलाईन व्यवहार इतर आरोपींच्या खात्यावर झाले आहेत.
या प्रकरणातील सर्व पुरावे हे कागदोपत्री स्वरूपाचे आहेत. तसेच आरोपीकडून पोलिसांना कोणताही माल किंवा पैसे जप्त करायचे नाहीत. त्यामुळे त्यांना पोलीस कोठडीत घेऊन चौकशी करण्याची (कस्टोडियल इंट्रोगेशन) गरज नाही.

गुन्ह्यात बनकर यांचा थेट किंवा हेतुपुरस्सर सहभाग असल्याचे दाखवणारे ठोस पुरावे प्रथमदर्शनी उपलब्ध नाहीत.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने संदीप बनकर यांना अटींवर जामीन मंजूर केला. या प्रकरणात बनकर यांच्या बाजूने ॲड. एस. के. भोस यांना ॲड. राहुल शिंदे, ॲड. उमेश अनभूले, ॲड. संग्राम चाकणे आणि ॲड. शिरीष ओहोळ यांनी मदत केली.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)











Leave a Reply