दिनांक ८ डिसेंबर २०२४,श्रीगोंदा:
लिंपणगाव येथे आयोजित कौटुंबिक हिंसाचार विरोधी पंधरवाडा जनजागृती अभियान समारोप कार्यक्रमात श्रीगोंदा जिल्हा न्यायाधीश एम. एस. शेख यांनी उपस्थित राहून समाजाच्या हितासाठी आपली भूमिका मांडली. “गरीब जनतेच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यात मला आनंद मिळतो,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

हा कार्यक्रम ग्रामीण विकास केंद्र आणि करो इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा न्यायाधीश एम. एस. शेख यांनी केले, तर अध्यक्षस्थानी लिंपणगावच्या सरपंच शोभाताई कोकाटे होत्या.
महिला सक्षमीकरणावर बोलताना शेख साहेब म्हणाले, “महिलांनी अन्याय सहन करू नये. जर परिस्थितीला तोंड देण्याची वेळ आली.. तर, महिलांनी योग्य ती भूमिका घेतली पाहिजे. महिलांमध्ये पुरुषांपेक्षा अधिक ताकद आहे. मात्र, महिलांनी कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा आदर राखावा आणि त्यांची देखभाल करावी.”

ते पुढे म्हणाले, “कपाळावरील टिकलीचे महत्त्व आहे. ती स्त्रीच्या प्रतिष्ठेचे प्रतीक आहे. मात्र, एकल महिलांकडे समाजाचा दृष्टिकोन वेगळा असतो, हे बदलण्यासाठी महिलांनी आत्मनिर्भरता स्वीकारली पाहिजे.”
शेख साहेब यांनी पालकांनी आपल्या मुलांकडे विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. “मुलांवर योग्य संस्कार करा, शाळा-कॉलेजमध्ये जाऊन त्यांच्या प्रगतीची चौकशी करा. मुलांना महापुरुषांचे विचार समजावून सांगा, त्यातून पुढील पिढी घडेल,” असे ते म्हणाले. त्यांनी मोबाईल व दुचाकी देण्यामुळे मुलांचे बिघडणे टाळण्याचा सल्लाही दिला.

अरुण जाधव यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्यानंतरही गरिबांसाठी योग्य संधी मिळाल्या नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. “75 वर्षांनंतरही रेशन कार्डसाठी भांडावे लागणे हे आपल्या व्यवस्थेचे अपयश आहे,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमात गटविकास अधिकारी राणीताई फराटे, पोलीस स्टेशनचे पीएसआय अहिरे साहेब, नायब तहसीलदार मुगदुल साहेब, पंचायत समिती समन्वयक अनिता काळे, उपसरपंच कृष्णा रोडे, ग्रामपंचायत सदस्य अरविंद कुरुमकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

महिला सक्षमीकरणाच्या कार्यात पल्लवी शेलार (टीम लीडर), लता सावंत, उज्वला मदने, रोहिणी राऊत, शितल रंधवे आदींनी सहभाग घेतला. एम. एस. डब्ल्यू. स्टाफनेही महत्त्वाची भूमिका बजावली.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
