अपरात्री खंडाळा घाटात बस बंद पडल्याने महाविद्यालयीन सहलीला अडथळा; प्रशासनाच्या तत्परतेने १४४ विद्यार्थी सुखरूप..!

दिनांक ७ डिसेंबर २०२४, श्रीगोंदा:

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाच्या जुनियर कॉलेजतर्फे आयोजित सहल ३ डिसेंबर रोजी एकविरा देवी, कार्ला लेणी, महड गणपती, पाली, अलिबाग या मार्गाने नियोजित होती. परंतु खंडाळा घाटाच्या टोकावर अचानक बसचा एअर पाईप फुटल्याने गाडी बंद पडली. रात्रीच्या घनघोर अंधारात घडलेल्या या घटनेत, गाडीतील ३८ विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना प्रसंगावधान राखत सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.

सहलीसाठी तीन बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. ज्यात १४४ विद्यार्थी/विद्यार्थिनी व शिक्षक प्रवास करत होते. खंडाळा घाटाच्या टोकावर रात्री ८.३० च्या सुमारास एका बसचा एअर पाईप फुटल्याने गाडी अचानक बंद पडली. त्या वेळी उपस्थित शिक्षकांनी हायवे पोलीस, खंडाळा पोलीस निरीक्षक, तसेच श्रीगोंदा आगार व्यवस्थापक यांच्याशी तत्काळ संपर्क साधला. स्थानिक प्रशासनाने वेळेत हस्तक्षेप करत घटनास्थळी दाखल होऊन सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सुरक्षित स्थळी हलवले.

घटनेनंतर खंडाळा पोलीस, हायवे पोलीस, खंडाळा आगार वर्कशॉप कर्मचारी तसेच स्थानिक प्रशासनाने त्वरित मदत केली. त्याचबरोबर श्रीगोंदा आगार व्यवस्थापकांनीही घटनास्थळी बस दुरुस्तीबाबत सूचना केल्या. स्थानिक शिक्षक अमोल साळवे सर, तसेच अन्य पोलीस आणि स्थानिक प्रशासन यांची मोलाची साथ लाभली.

सहलीत डॉ. राम ढगे, एसपी मखरे, संदीप दरेकर, सहल प्रमुख रत्नाकर झिटे, दिलावर पठाण, श्रीकांत थोरात, सौ.उषा बोरूडे, परवीन शेख, प्रतीक्षा शिंदे, स्मिता क्षीरसागर, संजय डफळ, आणि अरुण जाधव हे शिक्षक उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना शांत राहण्याचे आणि प्रशासनावर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले.

या घटनेत कोणतीही हानी झाली नाही, याबद्दल विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी प्रशासनाचे आणि पोलीस यंत्रणेचे आभार मानले आहेत. सहल यशस्वीरीत्या पूर्ण होऊन सर्व विद्यार्थी सुखरूप श्रीगोंद्यात परतले.

स्रोत:(अधिकृत माहितीनूसार)

Leave a Reply