दिनांक ७ डिसेंबर २०२४, श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहरातील दळवी वस्ती येथील रहिवासी आणि महादजी शिंदे विद्यालय, श्रीगोंदा येथील आठवी वर्गात शिकणारा ईशांत जालिंदर दळवी (वय १३) याचा दुर्दैवी मोटरसायकल अपघातात मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ईशांत हा त्याच्या शेतातील कामानिमित्त मोटरसायकलवरून जात असताना मोटरसायकलवरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाला. गाडी स्लीप होऊन तो खाली पडला आणि डोके दगडावर आपटल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

ईशांत हा दळवी कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या या अचानक जाण्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरातील नागरिक, शाळेतील शिक्षकवर्ग आणि मित्रपरिवार यांच्यात शोककळा पसरली आहे.

अभ्यासात हुशार आणि खेळात निपुण असलेल्या ईशांतने अल्प वयातच सर्वांचे लक्ष वेधले होते. त्याचा शांत स्वभाव आणि मित्रांशी असलेले मैत्र जिव्हाळ्याचे होते. त्याच्या जाण्याने मित्रपरिवारात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दळवी कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत परिसरातील नागरिक व शिक्षकांनी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. या दुर्दैवी घटनेने श्रीगोंदा परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.
स्रोत:(प्राप्त माहितीनूसार)
