दिनांक २० मे २०२६,श्रीगोंदा:
श्रीगोंदा नगरपालिकेच्या बेकायदेशीर रस्ता बांधकामाविरोधात हिरडे कुटुंबियांचे आमरण उपोषण तिसऱ्या दिवशीही (२० मे) सुरूच असून, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आता हे आंदोलन अधिक तीव्र व आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही नगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओ) पुष्पगंधा भगत यांनी आंदोलनाकडे पूर्णपणे पाठ फिरवल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम असून आज हे आंदोलन तहसील कार्यालयावरून थेट श्रीगोंदा नगर पालिका कार्यालयासमोर हलवण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते आहे.
या प्रकरणात न्यायालयाचा स्थगिती आदेश (स्टे) असतानाही राजकीय दबावापोटी रात्रीच्या वेळी बेकायदेशीर रस्ता तयार केल्याचायात मुख्य आरोप करण्यात आला आहे.
सौ. जयश्री नानासाहेब हिरडे व सौ. शोभा अरुण हिरडे यांनी निवेदनात म्हटले की, ‘दलित वस्ती सुधार योजनेचा’ निधी वापरून कोणतीही परवानगी न घेता रात्रीच्या वेळी हे काम केले. या योजनेच्या मंजुरीतील अत्यंत महत्त्वपूर्ण आणि कडक अटींचे पालिकेने उघड उल्लंघन केले आहे.

१८ मे रोजी आंदोलनाच्या पहिल्या दिवशी पालिकेचे अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली होती, मात्र त्यातून कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. त्यानंतर काल (१९ मे) आणि आज (२० मे) प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेलेली नाही.
“दोन दिवस सलग वैशाखाच्या भर उन्हात चाललेल्या या आमरण उपोषणामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची तब्येत कमालीची खालावली आहे. एका ज्येष्ठ महिलेला तर काल दवाखान्यात भरती करावे लागले.
एवढे होऊनही सीओ पुष्पगंधा भगत किंवा स्थानिक पदाधिकारी आंदोलनाकडे फिरकलेही नाहीत. प्रशासनाच्या या असंवेदनशीलतेमुळे आम्ही आता हे आंदोलन तहसील कार्यालयासमोरुन थेट श्रीगोंदा नगर पालिका कार्यालयाच्या समोर हलवणार आहोत. जोपर्यंत आमच्या मागण्यांची पूर्तता होत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही.”
— पीडित आंदोलक (हिरडे कुटुंबिय)

प्रशासनाच्या या भूमिकेमुळे आता या आंदोलनाची तीव्रता कमालीची वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्रोत:(अधिकृत माहिती)
















Leave a Reply