प्रशासनाच्या दिरंगाईविरोधात श्रीगोंद्यात ‘हलगी बजाव’ आंदोलन; बहुजन समाज पार्टीचा तहसील कचेरीवर एल्गार..
दिनांक ४ मे २०२६,श्रीगोंदा:
श्रीगोंदा तहसील कार्यालय आणि पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांच्या कथित निष्क्रियतेचा आणि प्रलंबित कामांचा निषेध करण्यासाठी आज बहुजन समाज पार्टीच्या वतीने ‘हलगी बजाव’ आंदोलन करण्यात आले. सोमवारी, ४ मे २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर हे अनोखे आंदोलन छेडण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.

बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. गेल्या अनेक महिन्यांपासून सर्वसामान्यांची कामे प्रशासकीय पातळीवर रखडलेली असून, अधिकारी केवळ आश्वासने देत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
हलगीच्या कडकडाटाने तहसील परिसर दणाणून गेला होता, ज्यामुळे काही काळ कार्यालयाचे कामकाज विस्कळीत झाले. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत प्रशासनाच्या संथ कारभाराचा तीव्र निषेध नोंदवला. “जनतेची हेळसांड थांबवा”, “कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाकडे गेल्या वर्षभरापासून विविध विभागांत अडकून पडलेली जनतेची कामे तात्काळ मार्गी लावावीत., घरकुल लाभार्थ्यांच्या जागेचे प्रस्ताव तांत्रिक कारणास्तव प्रलंबित न ठेवता त्यांना त्वरित मंजुरी द्यावी., कर्तव्यात कसूर करणाऱ्या आणि सर्वसामान्यांना हेलपाटे मारायला लावणाऱ्या निष्क्रिय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई व्हावी, खोटे वायदे आणि लबाड्या बंद करून जनतेची होणारी मानसिक व आर्थिक पिळवणूक थांबवावी. या मागण्यांचे निवेदन देण्यात आले होते.

आंदोलनाची तीव्रता आणि वाढती गर्दी पाहता, संबंधित विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. त्यांनी सुनील ओहोळ व इतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून, निवेदनातील मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आणि रखडलेली कामे ठराविक मुदतीत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर बहुजन समाज पार्टीने आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले.
“आज आम्ही केवळ हलगी वाजवून प्रशासनाला जागे केले आहे. जर दिलेल्या आश्वासनांची पूर्तता विहित वेळेत झाली नाही, तर यापुढील आंदोलन अधिक तीव्र आणि उग्र स्वरूपाचे असेल. आम्ही जनतेच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरण्यास मागेपुढे पाहणार नाही.”
— सुनील ओहोळ (जिल्हा प्रभारी, बहुजन समाज पार्टी)या आंदोलनात बहुजन समाज पार्टीच्या श्रीगोंदा विधानसभा युनिटचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक सहभागी झाले होते.
स्रोत:(आंदोलन)















Leave a Reply