शेतकऱ्यांची फसवणूक करणारा सहा महिन्यांपासून फरार आरोपी श्रीगोंदा पोलिसांच्या जाळ्यात; नाशिकमधून मुसक्या आवळल्या..

दिनांक ५ मे २०२६,श्रीगोंदा:

शासकीय सोलर पंप मिळवून देण्याचे आमिष दाखवून श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या अट्टल भामट्याला जेरबंद करण्यात श्रीगोंदा पोलिसांना यश आले आहे. रुपेश अशोक पवार (रा. कानमंडळे, ता. चांदवड, जि. नाशिक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, तो गेल्या सहा महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.

नोव्हेंबर २०२५ मध्ये श्रीगोंदा येथील अशोक बाजीराव भोसले यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती. आरोपी रुपेश पवार याने ‘रुपेश पवार फाउंडेशन’च्या माध्यमातून आणि स्वामी बाळासाहेब पिसे यांच्या मध्यस्थीने शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला होता.

त्याने श्रीगोंदा व कर्जत परिसरातील शेतकऱ्यांना अत्यंत कमी दरात शासकीय सोलर पंप मिळवून देतो असे सांगून तब्बल ७ लाख ८० हजार रुपयांना गंडा घातला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होता.

आरोपी मुंबईत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. त्यानुसार तपास पथक मुंबईला रवाना झाले, मात्र आरोपीने तीन दिवस पोलिसांना चकवा दिला. अखेर तो नाशिकमधील त्याच्या मूळ गावी गेल्याची खात्रीशीर माहिती मिळताच, पोलिसांनी वेशांतर करून सापळा रचला आणि कानमंडळे (ता. चांदवड) येथून त्याला ताब्यात घेतले.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण शिंदे, गहिनीनाथ यादव, संदीप राऊत, महादेव कोहक, सचिन वारे, अरुण पवार, विवेक दळवी आणि दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडू यांनी केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश आहिरे व पोलीस नाईक गणेश गाडे हे अधिक तपास करत आहेत. आरोपीने आणखी कोणाची फसवणूक केली आहे का, याचाही शोध पोलीस घेत आहेत.

सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश आहिरे व पोलीस नाईक गणेश गाडे हे अधिक तपास करत आहेत. आरोपीने आणखी कोणाची फसवणूक केली आहे का, याचाही शोध पोलीस घेत आहेत.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading