महावितरणच्या गलथान कारभारामुळे त्रस्त झालेल्या श्रीगोंदा तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला मोठे यश आले आहे.
माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाळ आणि उपसरपंच अनुराधा ठवाळ यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी १६ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयासमोर करण्यात आलेल्या प्राणांतिक उपोषणाची प्रशासनाने तातडीने दखल घेतली. महावितरणने शेतकऱ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य केल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले.
सहाय्यक अभियंता म्हणून श्री. अजय भोगम आजपासूनच हजर झाले असून, उद्यापासून नवीन वायरमन आणि लाईनमन यांचीही नियुक्ती होणार आहे.
आढळगावसह परिसरातील शेतकऱ्यांना उद्यापासून दिवसा वीज मिळणार आहे. याबाबतचे ‘टाईम शेड्युल’ महावितरणचे अधिकारी इंदलकर साहेब उद्या बैठकीत जाहीर करतील.
गेली ३-४ वर्षे प्रलंबित असलेला गव्हाणेवाडीसाठीचा ६३ केव्हीचा गावठाण ट्रान्सफॉर्मर ३० तारखेपर्यंत मंजूर होऊन कार्यान्वित केला जाईल. यामुळे सिंगल फेज विजेचा प्रश्न सुटेल.
प्रभाकर शिंदे यांचा २५ केव्ही आणि हिरडगावमधील मुक्ताजी जाधव यांचा ६३ केव्हीचा ट्रान्सफॉर्मर मंजुरीच्या प्रक्रियेत आहे.
या उपोषणासाठी आढळगाव, भावडी, कोकणगाव, हिरडगाव, चांडगाव, घोडेगाव यांसह पूर्व भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नायब तहसीलदार मिलिंद जाधव आणि महावितरणचे अधिकारी इंदुलकर यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण सोडण्यात आले.
“शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठीच आम्ही समाजकारणात आहोत. प्रशासनाशी दोन हात करून का होईना, पण शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणे हेच आमचे कर्तव्य आहे.” — अनिल ठवाळ (मा. जि. प. सदस्य)
यावेळी धनंजय काळे, बबन आबा काळे, सभापती विलासराव भैलुमे, सरपंच मिलिंद कदम, उपसरपंच मारुती सुंबे यांसह अनेक मान्यवर आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.