श्रीगोंदा पोलीस वसाहतीत दिवसाढवळ्या ‘खाकी’च्या नाकाखाली डल्ला; भंगार चोरीत रॅकेट सक्रिय..?

दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ श्रीगोंदा:

श्रीगोंदा शहराच्या मध्यवस्तीत आणि प्रशासकीय इमारतींच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस वसाहतीतील जुन्या वाहनांच्या आणि साहित्याच्या भंगारावर चोरट्यांनी डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

विशेष म्हणजे, हे भंगार चोरीला गेले नसून ते जाणीवपूर्वक “पचवण्यात” आल्याची चर्चा आता शहरात रंगू लागली असून, यामध्ये नेमके कोण सामील आहे? असा संतप्त सवाल सर्वसामान्य श्रीगोंदेकर विचारत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा नगरपालिकेच्या काही पदाधिकाऱ्यांनी वसाहतीची ‘साफसफाई’ करण्याच्या नावाखाली या मोहिमेत पुढाकार घेतला होता. मात्र, याच मोहिमेच्या आडून वसाहतीमधील मोठी जुनी वाहने आणि मौल्यवान लोखंडी भंगाराची दिवसाढवळ्या विल्हेवाट लावण्यात आली.

ज्या ठिकाणी तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन आणि विविध राजकीय नेत्यांची कार्यालये आहेत, तिथेच हा प्रकार घडल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

या गंभीर प्रकरणाची दखल घेत ज्येष्ठ नेते घनश्याम अण्णा शेलार यांनी सुरुवातीला आक्रमक भूमिका घेतली होती. जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार आणि निवेदन देणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना जाहीर केले होते. मात्र, त्यानंतर या निवेदनाचे पुढे काय झाले?

प्रशासनाने काय कारवाई केली.? याबाबत त्यांनी मौन बाळगले आहे. हे प्रकरण राजकीय स्तरावर दाबण्याचा प्रयत्न तर होत नाही ना, अशी चर्चा आता दबक्या आवाजात सुरू आहे.

वसाहतीतून साहित्य चोरीला जाते आणि पोलिसांना पत्ता लागत नाही, हे अनाकलनीय आहे., नगरपालिकेच्या काही ठराविक लोकांच्या मदतीने हे भंगार हलवण्यात आल्याचा आरोप होत आहे. हे चोरीचे प्रकरण दाबण्यासाठी काही साटंलोटं झालं आहे का.?

पोलीस वसाहतीतील या संशयास्पद भंगार चोरीमुळे श्रीगोंदा शहरात संतापाची लाट आहे. हे केवळ भंगार चोरीचे प्रकरण नसून सरकारी मालमत्तेची लूट असल्याचा दावा नागरिक करत आहेत.

या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी आणि दोषींवर कारवाई करण्यासाठी लवकरच श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर भव्य आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे.

स्रोत:(अधिकृत माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading