दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ श्रीगोंदा:
श्रीगोंदा आगारातील माजी वाहतूक निरीक्षक श्री. विनायक गोविंदा साळवे यांचे सुपुत्र अनिकेत विनायक साळवे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून यांत्रिकी अभियांत्रिकी (Mechanical Engineering) विषयात पीएचडी (Ph.D.) पदवी प्रदान करण्यात आली आहे.
अनिकेत साळवे यांनी आपला शोधप्रबंध ‘इन्व्हेस्टिगेशन ऑन नॅचरल फायबर बेस्ड हायब्रीड कॉम्पोझिट्स विथ मेटॅलिक रिइन्फोर्समेंट अंडर स्टॅटिक अँड इम्पॅक्ट लोडिंग‘ या विषयावर सादर केला होता.
नैसर्गिक तंतूंवर आधारित संमिश्र पदार्थांच्या सखोल अभ्यासावर केंद्रित असलेल्या या संशोधनासाठी त्यांना डॉ. मचे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
अनिकेत साळवे हे २००८ मध्ये एम.ई. (M.E.) झाले असून, सध्या ते पुण्यातील नामांकित विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VIIT) येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल संस्थेचे संचालक, सहकारी प्राध्यापक, तसेच श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकार आणि वकील क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक होत आहे.
त्यांच्या या यशामुळे साळवे परिवारासह श्रीगोंदा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, मित्रमंडळी व सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

