कष्टाला यशाची जोड.! पेडगावच्या जास्मिन आणि लैला इनामदार यांची महसूल सहाय्यक पदी निवड..

दिनांक १२ फेब्रुवारी २०२५, श्रीगोंदा:

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या सन २०२३/२४ या स्पर्धा परीक्षेत पेडगाव (ता. श्रीगोंदा) येथील जास्मिन यासीन इनामदार आणि लैला यासीन इनामदार या दोघींनी घवघवीत यश मिळवत महसूल सहाय्यक (Revenue Assistant) पदासाठी पात्रता मिळवली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.

जास्मिन आणि लैला या दोघी श्री यासीन जान मोहम्मद इनामदार यांची कन्या असून, त्यांचे कुटुंब शेतकरी पार्श्वभूमीचे आहे. त्यांच्या आई हमीदा यासीन इनामदार या गृहिणी असून, त्यांनी आपल्या मुलींना शिक्षणाची समान संधी दिली. गरीब परिस्थिती असूनही या दोघींनी कठोर परिश्रम, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.

स्पर्धा परीक्षा आणि त्यासाठीची तयारी ही सामान्यतः कठीण आणि आव्हानात्मक असते. मात्र, जास्मिन आणि लैला यांनी अडचणींवर मात करत, कोणत्याही खासगी कोचिंगशिवाय अथक मेहनत घेतली. त्यांच्या जिद्दीचे आणि मेहनतीचेच हे फळ आहे, असे मत परीसरातील शिक्षक, समाजसेवक आणि ग्रामस्थांनी व्यक्त केले.

या यशाबद्दल पेडगाव गावासह संपूर्ण श्रीगोंदा तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. “मुलगा-मुलगी भेदभाव न करता दोघांनाही समान शिक्षण दिल्यास, ते आपल्या कुटुंबाचे आणि समाजाचे नाव उज्ज्वल करू शकतात,” असा संदेश इनामदार कुटुंबाने आपल्या उदाहरणातून दिला आहे.

Advertise..

“हे यश सहज मिळालेले नाही. अनेकदा आर्थिक अडचणी आल्या, पण आई-वडिलांनी कायम आमचा आत्मविश्वास वाढवला. मेहनत आणि सातत्य हाच यशाचा मार्ग आहे,” असे जास्मिन आणि लैला यांनी सांगितले.

यश मिळवलेल्या दोन्ही भगिनींचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांचा सत्कार करण्यासाठी गाव आणि सामाजिक संस्थांकडून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

स्रोत:(अधिकृत माहिती नुसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading