दिनांक १४ जुलै २०२४, श्रीगोंदा:
श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील करिअर कट्टा उपक्रमाअंतर्गत पोलीस भरतीपूर्व व स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून १२ जुलै २०२४ रोजी निवड झालेल्या यादीमध्ये आशा शामराव अस्वर, रा- गणपती मळा, श्रीगोदा या प्रशिक्षणार्थी मीरा भाईंदर पोलीस भरतीमध्ये निवड झाली आहे.
कॉलेजमध्ये सुरू असलेल्या पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाबद्दल त्यांना दोन वर्षांपूर्वी माहिती मिळाली आणि त्यांनी प्रशिक्षण सुरू केले. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे १२ वी नंतर शिक्षण सुटले, घरच्यांनी लग्न लावून दिले, सासरची आर्थिक स्थितीही जेमतेम, मोठा मुलगा इ. सातवीत, मुलगी इ. पाचवीत, खांद्यावरती प्रपंचाची जबाबदारी आणि पोलीस भरतीची वयाची मर्यादा संपत आलेली. सासरच्या मंडळींनी प्रोत्साहन दिले आणि आशाताईंनी प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आणि यश संपादन केले.
छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांच्या हस्ते आशाचा आणि तिच्या घरातील सर्व मंडळींचा कॉलेजवर सन्मान केला गेला. दादांनी कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सोबत राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष सुभाष काका शिंदे, कॉलेजचे प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते.
तिने मनोगत व्यक्त करताना दिनक्रम नमूद केला. पहाटे ४:०० वाजता दिनक्रम सुरू व्हायचा. घरची आणि जनावरांची कामे आवरून छत्रपती कॉलेजवर सकाळी ५:३० ते ७:३० वाजेपर्यंत ग्राउंडवर सराव करायचा. परत घरी जाऊन स्वयंपाक आणि शेतीची कामे करून छत्रपती कॉलेजवर सायंकाळी ४:०० वाजता लेक्चर करायचे. परत घरी जाऊन संध्याकाळी आवरायचं आणि जेवण झाल्यानंतर अभ्यास करायचा. मागील वर्षी अवघ्या ४ मार्कांनी हुलकावणी दिली आणि पुन्हा नव्या जोमाने तयारी सुरू केली आणि शेवटी यादीत पहिल्या नंबरला नाव आले. तिने या यशाचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र (दादा) नागवडे, सर्व विश्वस्त, प्राचार्य आणि कॉलेजमधील मार्गदर्शक शिक्षकांना दिले आहे.
शिवाजीराव नागवडे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने १९८२ साली महाविद्यालय सुरू केले. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत संस्थेच्या गुणात्मक प्रगतीसाठी अथक परिश्रम घेतले. ९९ विद्यार्थी संख्येवर सुरू झालेले महाविद्यालयात आज ३८२७ विद्यार्थी अध्यापन करत आहेत. १६ एकर भौतिक सुविधा असलेला सुंदर परिसर आहे. सुसज्य ४०० मी. ट्रॅक आणि अभ्यासिका आहे.
बापूंच्या संस्कारात वाढलेले राजेंद्र(दादा) नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाची उत्तम प्रगती सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन अनेक कौशल्य विद्यार्थी आत्मसात करत आहेत. अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यश संपादन करत असून, विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यामुळे महाविद्यालयाची यशोगाथा राज्य पातळीवर पोहचली आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तसेच या विभागाचे संचालक यांनी यापूर्वी महाविद्यालयाचा सन्मान केलेला आहे.
“स्व.बापूंनी बिकट परिस्थितीत या संस्थेच्या गुणात्मक प्रगतीसाठी जीवाचे रान केले. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम आम्ही सर्वजण करत असताना, कॉलेजचा विद्यार्थी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकला पाहिजे, म्हणून कॉलेजमध्ये सुसज्य अशा सर्व भौतिक व शैक्षणिक सुविधा उपलब्ध केल्या आहेत” असे मत संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र (दादा) नागवडे यांनी व्यक्त केले.
या करता प्रा. सतीश चोरमले, प्रा. वैभव सोनवणे, श्री किरण बंड, प्रा. विवेक शेलार, दर्शन आल्हाट, घोडके सर, प्रा. महेश गिरमकर यांनी विशेष मेहनत घेतली तसेच करिअर कट्टा समन्वयक प्रा.विलास सुद्रिक व डॉ.विजय इथापे यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र (दादा) नागवडे, उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, सौ. अनुराधाताई नागवडे, निरीक्षक सचिनराव लगड, सर्व विश्वस्त, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)






