लेख..
आज महाराष्ट्राच्या मातीतून एकच आर्त हाक ऐकू येतेय, ती म्हणजे न्यायाची! विकासाच्या चकचकीत घोषणांच्या आड सामान्य माणसाचे जगणे करपून जात आहे.
कागदावरचा विकास आणि जमिनीवरचे वास्तव यातली दरी आता सांधण्यापलीकडे गेली आहे, म्हणूनच आता ‘दंडूका मोर्चा’ काढण्याची वेळ आली आहे, असे परखड मत सरपंच राम घोडके यांनी व्यक्त केले आहे.
बळीराजा रात्रंदिवस राबतो, पण त्याच्या पदरात पडते काय? कांदा, कापूस, सोयाबीन उत्पादक आज हतबल आहेत. खते, बियाणे आणि डिझेलचे दर गगनाला भिडले असताना पिकाला रास्त भाव मिळत नाही. ही केवळ आर्थिक हानी नसून शेतकऱ्याच्या स्वाभिमानाची विटंबना आहे.
- लालपरीची दुरवस्था: एसटी वेळेवर नसल्याने ग्रामीण भागातील मुलींचे शिक्षण थांबत आहे. बापाच्या डोळ्यातील अश्रू आणि लेकीच्या तुटणाऱ्या स्वप्नांना जबाबदार कोण?
- आरोग्य आणि शिक्षण: सरकारी शाळा आणि दवाखाने औषधोपचाराअभावी व्हेंटिलेटरवर आहेत. गरिबांना खासगी शिक्षण आणि उपचारांची लूट सहन करावी लागत आहे.
- घरगुती गॅसपासून ते डाळींपर्यंत सर्वच वस्तू सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्यातच भर म्हणून की काय, प्रशासकीय पातळीवर ‘हप्ता संस्कृती’ फोफावली आहे. अवैध धंदे जोरात आणि प्रामाणिक नागरिक धास्तावलेला, असे उलटे चित्र आज पाहायला मिळत आहे.
- केवळ हिंदू-मुस्लिम वाद किंवा राजकीय घोषणांनी पोटी भरत नाहीत. तरुणांच्या हाताला काम नाही आणि कष्टकऱ्याच्या घामाला दाम नाही. जेव्हा सहनशक्तीचा अंत होतो, तेव्हा लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरणे हाच एकमेव पर्याय उरतो.
हा ‘दंडूका मोर्चा‘ केवळ रागाचे प्रतीक नसून व्यवस्थेला दिलेला निर्वाणीचा इशारा आहे. माणुसकी हरवण्यापूर्वी आणि असंतोषाचा ज्वालामुखी उसळण्यापूर्वी राज्यकर्त्यांनी आत्मचिंतन करून शेती, शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराचे प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे.
वेळ आली आहे – एकवटण्याची, प्रश्न विचारण्याची आणि न्याय हक्कासाठी लढण्याची!
स्रोत:(राम घोडके)

