आम्ही अनेक वेळा असे ऐकतो कि, शिक्षणाने मनुष्याची प्रगती होते. शाळेत जाऊन चांगला अभ्यास करून डॉक्टर, इंजीनियर शिक्षक बनता येते. पण शाळेत न जाता जिद्दीच्या बळावर साहित्यसम्राट बनता येते हे जगाला दाखवुन दिले ते सहित्यरत्न अण्णाभाऊ साठेनी.
१ ऑगस्ट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती. त्यानिमित्त त्यांच्या महान कार्यास उजाळा. अण्णांचा जन्म वाटेगाव येथे मातंग समाजात झाला. तुकाराम ते साहित्य सम्राट अण्णाभाऊ हा प्रवास सोपा नव्हता. जातीय भेदभावाचे चटके त्यांना बसले. अस्पृश्य असल्याने शिक्षण घेता आले नाही. उच्चवर्णीय कनिष्ठ जातींवर अंन्याय करत होते.
अण्णाभाऊंना अन्याय व जातिव्यवस्थेची चीड येत असत. अण्णाभाऊंनी अन्याय, जातीभेद विरोधात लेखणी, लोकगीते पोवाडे द्वारे बंड पुकारले. या महापुरुषाने इथल्या अन्यायी समाज व्यवस्थेच्या छाताडावरती पाय रोवून हजारो वर्षापासून चालत आलेल्या विकारांच्या दऱ्या दूर करत समतेच्या विचारांचा वटवृक्ष निर्माण केला.
एकूण ३५ कादंबऱ्या त्यांनी लिहल्या. पोवाडे, लोकगीते मधुन त्यांनी अन्याय व विषमते विरोधात आवाज उठवला. अण्णांच्या कृष्णकाठच्या कथा, फकिरा अशा अनेक कादंबऱ्या प्रसिध्द झाल्या. त्यांचे सहित्य समाज परिवर्तनास दिशा देणारे ठरले. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही महत्वपूर्ण भूमिका बजावली.
लेखणीने त्यांनी शोषित समाजाचे दुखः मांडले. अण्णांना अनेक सन्मान प्रदान केले. त्यांनी केलेल्या समाज कार्यासाठी त्यांना मरणोत्तर पदमश्री पुरस्कार मिळाला.
“जग बदल घालूनी घाव सांगून गेले मज भीमराव” हे गाणे अण्णांनी लिहले. अण्णा म्हणत ” पृथ्वी हि शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून, ती कष्करी व श्रमिकाच्या तळहातावर तरलेली आहे. “अण्णांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य शोषित वंचीत समाजाच्या कल्याणाकरीता वाहिले. अण्णांचे साहीत्य आजही समाजाला दिशादर्शक ठरते. अण्णांचे विचार आम्हांस नेहमीचं जगण्यास प्रेरणा देतात. अण्णांची जयंती हि नाचून नव्हे तर वाचून साजरी करणे गरजेचे आहे. अण्णांची जयंती विविध सामाजिक उपक्रमाद्वारे साजरी करणे हिच खरी काळाची गरज आहे. अण्णांच्या महान कार्यास विन्रम अभिवादन.
स्रोत:(लेखक- प्रा. महेंद्र मिसाळ ९८५०३९२४१४, सुप्रसिद्ध व्याख्याते व लेखक)






