वर्गाबाहेरील विद्यार्थी ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार..! बाबासाहेब..

लेखक: महेंद्र मिसाळ..

जगात कित्येक लोक आहेत जे अडचणींना व समस्यांना घाबरून पळतात,निराश होतात व खचतात.. काही वेळा तर काही माणसे संकटाना घाबरून आत्महत्याही करतात. पण काही माणस हि संकटाला न घाबरता संकटाच्या छाताडावर पाय रोवुन गरूडझेप घेतात व जगात इतिहास घडवतात.

असेच एक नाव जगाच्या इतिहासात व माणसांमाणसांच्या हृदयात दैवत बनून कोरले गेले. ते नाव म्हणजे प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर १४ एप्रिल बाबासाहेबांची जयंती त्या निमित्त त्यांच्या महान कार्यास विन्रम अभिवादन.

त्या काळी समाजात जातीभेद, धर्मभेद प्रचंड प्रमाणात वाढले होते. चार वर्णामधून चार हजार जाती निर्माण झाल्या होत्या. अस्पृश्य म्हणून समाजात दलितांना वेगळी वागणूक दिली जात होती. दलितांना मंदिरात प्रवेश बंदी होती. दलितांना सार्वजनिक ठिकाणी पाणी भरण्यास मज्जाव केला जात असत. समाजात उच्च- नीच काळा- गोरा असे भेद होते. बाबासाहेबांना बालपणीच अस्पृश्य म्हणून जातीव्यवस्थेचे चटके सहन करावे लागले.

भीमराव वर्गात गेले असता वर्गातील मुले विटाळ होवु नये म्हणुन वर्गाबाहेर पळू लागली. भिमरावाला गुरुजींने वर्गाबाहेर बसण्यास सांगितले. भिमराव वर्गाबाहेर बसून शिक्षण घेवू लागले. भीमराव तल्लख बुद्धिमत्तेचे होते. एकदा वर्गात गुरुजींनी सांगितलेले गणित कोणालाही सुटले नाही पण भिमरावांनी गणित बरोबर सोडवले.

याबरोबरच त्यांनी दलित बांधवांचे आयुष्याचे जगण्याचेही गणित सोडवले. अस्पृश्य व्यक्तीच्या गळ्यातील मडके व कमरेला असलेला झाडू कायमचा दूर करण्यासाठी बाबासाहेबांनी लढा दिला. बाबासाहेबांनी उच्च शिक्षण घेतले.

नाशिक येथील काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश मिळवून देण्यासाठी त्यांनी आंदोलन केले. महाड येथील चवदार तळे सत्याग्रह करत दलितांनाही इतर मानवाप्रमाणे हक्क न्याय मिळावा यासाठी त्यांनी सर्वानाच बरोबर घेत समतेचे पाणी पाजले.

बाबासाहेबांनी.”द प्रॉब्लेम ऑफ द रूपी” “थॉट्स आन पकिस्तान” “शूद्र कोण होते” सारखे ग्रंथ लिहून सामाजीक परिस्थितीवर प्रकाश टाकला. त्यांनी “मुकनायक” पाक्षिक निर्माण केले. भीमराव ते बाबासाहेब हा प्रवास सोपा नव्हता. दलित बांधवाच्या न्याय हक्कासाठी स्वःताच हिमालयाएवढ दुःख दूर करत समाजाचे अश्रू पुसण्याचे कार्य त्यांनी केले.

बाबासाहेबांची आई बाबासाहेब सहा वर्षाचे असताना वारली पुढे बाबासाहेबांची चार मुलेही वारली. पत्नीचे ही निधन झाले. पण हा संघर्षयोद्धा दलित समाज बांधवांना माणूस म्हणून जगता यावे त्यांना त्यांचे हक्क मिळावेत म्हणुन आयुष्यभर लढतच राहिला. जगात आदर्श अशी भारतीय राज्यघटना लिहण्याचे महान कार्य बाबासाहेबांनी केले. बाबासाहेबांचे विचार जगाला योग्य दिशा देण्याचे कार्य नक्कीच करतील.

स्रोत:(लेखक-प्रा.महेंद्र मिसाळ (सुप्रसिद्ध वक्ते व लेखक) 9850392414..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading