श्रीगोंदा.. जयंती उत्सवांत विचारांची जागा मनोरंजनाने घेतली; ‘Gen Z’ पिढीच्या वैचारिक गोंधळावर अजिंक्य चांदणे यांचा प्रहार.. महापुरुषांच्या विचारांची मशाल तेवत ठेवा, व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीच्या जाळ्यात अडकू नका: अजिंक्य चांदणे..

श्रीगोंद्यात फुले, शाहू, आंबेडकर विचार मंचतर्फे प्रबोधनपर जयंती उत्सव संपन्न; तरुणांना परिवर्तनाचे आवाहन..

दिनांक २२ एप्रिल २०२६,श्रीगोंदा:

“समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या घटनात्मक मूल्यांवर आधारित महापुरुषांचे विचार आपण अंगीकारले पाहिजेत. आज प्रबोधन कार्यक्रम रटाळ वाटत असले, तरी बुद्धीची भूक केवळ वाचन आणि विचारांतूनच पूर्ण होऊ शकते.

तरुण पिढी सध्या ‘व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी’मध्ये व्यस्त असून चळवळीपासून दूर जात आहे. तरुणांनी आपला मेंदू अपंग होऊ न देता शत्रू आणि मित्र ओळखायला शिकावे,” असे परखड मत DPI चे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे यांनी व्यक्त केले.

श्रीगोंदा येथे फुले, शाहू, आंबेडकर विचार मंच आणि तालुक्यातील पुरोगामी संघटनांच्या वतीने आयोजित महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगेबाबा संयुक्त जयंती उत्सवाच्या प्रबोधन कार्यक्रमात ते बोलत होते.

आपल्या भाषणात चांदणे यांनी चळवळीच्या इतिहासातील बलिदानाचा उल्लेख केला. ते म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या काळापासून जयंती उत्सवांवर अनेकदा हल्ले झाले, मात्र निष्ठा आणि समर्पण यामुळे अनुयायांनी हे कार्य थांबवले नाही. विद्यापीठ नामांतर लढ्यात पोचिराम कांबळे या मातंग समाजाच्या युवकाने दिलेले बलिदान विसरता येणार नाही. तो चळवळीतील पहिला मातंग शहीद ठरला.”

महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकरांच्या शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकताना ते म्हणाले, महात्मा फुलेंनी ‘विद्येविना मती गेली’ हा संदेश दिला, तोच वारसा पुढे नेत बाबासाहेबांनी अफाट विद्या आत्मसात केली.

“शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे,” हा संदेश समाजाच्या प्रगतीसाठी आजही तितकाच लागू आहे. स्त्रियांच्या उद्धारासाठी महात्मा फुलेंनी केलेले कार्य महिलांनी समजून घेणे गरजेचे आहे.

संविधानाबद्दल बोलताना चांदणे यांनी स्पष्ट केले की, “संविधान हा केवळ दलितांचा ग्रंथ नाही, तर तो देशातील प्रत्येक मानवासह पशू-प्राण्यांचाही आधार आहे. सध्या महापुरुषांच्या जयंतीचे स्वरूप वैचारिक न राहता मनोरंजनाकडे झुकत आहे, ही चिंतेची बाब आहे. ‘Gen Z’ पिढीने आपल्या अस्मितेबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे.”

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गणेश फरताळे महाराज यांनी भूषवले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. ज्ञानदेव भोसले यांनी केले, तर सूत्रसंचालन ॲड. महेंद्र शिंदे यांनी केले.

यावेळी विचारपीठावर ॲड.आरती शिरवाळे, सौ. भोसले मॅडम, भगवान आबा गोरखे, संजय लोंडके (DPI बीड जिल्हाध्यक्ष) हे होते.

तसेच ॲड संभाजी आप्पा बोरुडे, मुकुंद सोनटक्के (परिचय), राजेंद्र पोकळे, अनिल ठवाळ, कुणाल शिरवाळे, मनीषा घोडके सह बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुक्यातील विविध सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांनी सहकार्य केले. शेवटी नंदूभाऊ ससाने यांनी उपस्थितांचे आभार मानले.

स्रोत:(आयोजित कार्यक्रम)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading