“श्रीगोंदा: “जयंतीला पुण्यतिथी म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधींचा निषेध; पत्रकारांना धमकवाल तर गाठ पॅंथरशी!”: दीपकभाई केदार

दिनांक १६ एप्रिल २०२६ श्रीगोंदा:

महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संत गाडगेबाबा यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त श्रीगोंदा येथील शेख महमंद महाराज पटांगणावर आयोजित सभेत ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांनी जाहीर आवाहन केले.

“माणूस आधुनिक संकटांनी ग्रासला जात असताना, मानवी मूल्ये आणि माणुसकी जोपासणे हेच खरे आव्हान आहे,” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

आपल्या भाषणात केदार यांनी आधुनिक काळातील अंधश्रद्धेवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, “एकीकडे विज्ञान युग पुढे जात असताना दुसरीकडे भोंदू बाबा महिलांची फसवणूक करत आहेत. जर राज्य शासनाने महात्मा फुलेंचे ‘तृतीय रत्न’ नाटक प्रकाशित केले असते, तर खरात सारख्या भोंदू बाबांची निर्मितीच झाली नसती. 

शासनाने हे नाटक तात्काळ प्रकाशित करावे.” मीडियातून भोंदू बाबांचे उदात्तीकरण करून सामान्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

देशातील सद्यस्थितीवर भाष्य करताना त्यांनी आदिवासी आणि दलितांवरील वाढत्या अत्याचाराचा पाढा वाचला. “एका बकऱ्यासाठी आदिवासीला मारले जाते, हा जातीवादाचा कळस आहे. विरोधकांकडून एकोपा तोडून अत्याचार वाढवण्याचे षडयंत्र रचले जात आहे, त्यापासून बहुजनांनी सावध व्हावे,” असा इशारा त्यांनी दिला. दीपकभाई केदार यांनी आपल्या भाषणात स्थानिक राजकारण्यांच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले:

“श्रीगोंद्याचे लोकप्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला पुण्यतिथी म्हणतात, ही बाब अत्यंत निषेधार्ह आहे.लोकप्रतिनिधींनी किमान महापुरुषांच्या इतिहासाचे भान ठेवावे.”

“येथील पत्रकारांना आणि सामान्य समाज घटकांना धमकवणाऱ्यांनी याद राखावी, हा पॅंथर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे,” अशा शब्दांत त्यांनी धमकावणाऱ्यांना इशारा दिला.

या महामानव विचार प्रबोधन यात्रा संयुक्त जयंती उत्सवा प्रसंगी श्रीगोंदा शहर आणि तालुक्यातील कार्यकर्ते, सावित्री फातिमा सद्भावना विचारमंच, फुले शाहू आंबेडकर विचार मंच, ऑल इंडिया पँथर्स सेना, अपंग दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भविष्यातील धोके, कोरोना लसीचे दुष्परिणाम आणि महिलांवरील अत्याचार या विषयांवरही यावेळी चर्चा करण्यात आली.

स्रोत:(दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी आयोजित कार्यक्रम)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading