महिला व बाल विकास योजनांत अहिल्यानगर आघाडीवरबाल संगोपन योजनेत राज्यात सर्वाधिक लाभार्थी

अहिल्यानगर, दि.१७:

महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे अहिल्यानगर जिल्हा राज्यात आघाडीवर असून, ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेत’ सर्वाधिक लाभार्थी जिल्ह्यात आहेत. सन २०२४-२५ मध्ये ७ हजार १२३ लाभार्थ्यांना १९ कोटी २३ लाख २१ हजार रुपयांचे वितरण करण्यात आले, तर सन २०२५-२६ मध्ये १० हजार १११ लाभार्थ्यांना आतापर्यंत ४ कोटी ५४ लाख ९९ हजार ५०० रुपये वितरित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय कदम यांनी दिली.

केंद्र शासनाच्या प्रतिपालकत्व व प्रायोजकत्व योजनेंतर्गत कोविड-१९ काळात पालक गमावलेल्या मुलांना आधार देण्यात आला असून, एकूण १ हजार ५२१ मुलांना ५ कोटी ४७ लाख ५६ हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. जिल्ह्यात अनाथ प्रमाणपत्राच्या माध्यमातून ५४६ मुलांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले असून, त्यापैकी १५ मुलांना शासकीय नोकरी मिळाली आहे.

बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. २७ नोव्हेंबर ते ८ मार्च २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या अभियानादरम्यान प्रभावी जनजागृती व कृतीमुळे हे यश संपादन झाले. मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत कार्यरत चाईल्ड हेल्पलाईन (१०९८) द्वारे २४ तास सेवा उपलब्ध करून दिली जात असून, मागील वर्षभरात ४८ बालविवाह रोखण्यात यश आले आहे.

महिला व बाल विकास विभागाच्या १३ कार्यालयांसाठी ‘अहिल्या भवन’ उभारणीस १५ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली असून, पुढील एक ते दीड वर्षांत इमारत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या इमारतीत सर्व कार्यालये एकाच छताखाली उपलब्ध होऊन नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व सेवा मिळणार आहेत. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत जिल्ह्यात ११ लाख ३९ हजार लाभार्थ्यांना फेब्रुवारीपर्यंत लाभ वितरित करण्यात आला आहे.

जिल्ह्यात ‘सखी वन स्टॉप सेंटर’ व ‘महिला सक्षमीकरण केंद्र’ कार्यरत असून, जिल्हा रुग्णालय परिसरात सखी केंद्राची प्रशस्त इमारत आहे. संगमनेर येथे शक्ती सदन व सखी केंद्र सुरू असून अडचणीत आलेल्या महिलांना मदत दिली जाते. तसेच पिंक ई-रिक्शा योजनेद्वारे गरजू महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात मदत केली जात आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading