शहीद जवानांच्या मूळ गावी स्मारक उभारण्यासाठी प्रशासन कटिबद्ध – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील..

अहिल्यानगर, दि. १५ :

देशाच्या रक्षणासाठी प्राणार्पण करणाऱ्या शहीद जवानांचे केवळ स्मरण न राहता त्यांच्या बलिदानाची स्मृती कायम राहावी, यासाठी त्यांच्या मूळ गावी स्मारके उभारण्याबाबत प्रशासन कटिबद्ध असल्याची ग्वाही जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान व पुरस्कार सोहळा आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, आमदार अमोल खताळ, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, उपमहापौर धनंजय जाधव, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील शहीद जवान शिपाई संदीप पांडुरंग गायकर यांच्या पत्नी श्रीमती दिपाली संदीप गायकर यांना राज्य शासनाच्या वतीने एक कोटी रुपयांचा धनादेश पालकमंत्र्यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. यावेळी पालकमंत्र्यांनी शहीद कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत, प्रशासन व संपूर्ण जिल्हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असा विश्वास दिला.

पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले की, उल्लेखनीय कार्यातून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतःसह जिल्ह्याचाही लौकिक वाढवला आहे. प्रशासनातील सर्व घटकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे जिल्ह्याचा नावलौकिक राज्यभर वाढला असून शासनाला या गुणवंत अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सार्थ अभिमान आहे.

जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात पोलीस दलाचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगताना त्यांनी पोलीस अधिकारी व जवानांचे विशेष कौतुक केले. मनुष्यबळाची कमतरता असतानाही संपूर्ण जिल्ह्याच्या सुरक्षेची जबाबदारी सक्षमपणे पार पाडणाऱ्या पोलीस दलाच्या तत्परतेमुळे जिल्हा अधिक सुरक्षित राहिल्याचे त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे रोजी पोलीस कवायत मैदानावर हा सत्कार सोहळा आयोजित करण्याचे नियोजन होते. मात्र, कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच पुरस्कारार्थींना योग्य सन्मान मिळावा या उद्देशाने कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कोविड ड्युटी बजावताना मृत्यू झालेल्या ग्रामपंचायत शिपाई कै. शिवाजी भीमाजी गुडेकर यांच्या वारसदार रविंद्र शिवाजी गुडेकर व राजेंद्र शिवाजी गुडेकर यांना ५० लाख रुपयांची मदत यावेळी प्रदान करण्यात आली.

विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय दशरथ घोगरे यांना ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार’, पोलीस पाटील दादासाहेब गणपत भोसले यांना ‘राज्यपाल विशेष उल्लेखनीय सेवा पुरस्कार’ तसेच ग्राम महसूल अधिकारी संगीता मुरलीधर मगर यांचा गौरव करण्यात आला.

महिला व बालविकास विभागाच्या वतीने देण्यात येणारा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जिल्हास्तरीय पुरस्कार’ सावित्रा प्रशांत गायकवाड आणि श्रीमती संगीता अरविंद मालकर यांना प्रदान करण्यात आला.

पोलीस व कृषी विभागात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. उत्कृष्ट सेवेबद्दल अप्पर पोलीस अधीक्षक वैभव मनोहर कलुबुर्मे, मुख्तारखान गुलजारखान पठाण, प्रल्हाद भानुदास गिते, नितीन पोपट गांगुर्डे, मनोहर नामदेव शेजवळ, अजय नारायण नगरे, संजय जबाजी खंडागळे, गोविंद दादासाहेब गोल्हार, राजू आप्पासाहेब सद्रिक, राजेंद्र केशव पाटोळे, सुनील बबनराव नेहूल आणि प्रविण पुंडलिक साळुंखे यांना ‘पोलीस महासंचालक पदका’ने गौरविण्यात आले.

तसेच कृषी विभागाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवल्याबद्दल सहाय्यक कृषी अधिकारी किरण सुदाम घोडके, उपकृषी अधिकारी विजय राजाराम केदारे, मंडळ कृषी अधिकारी किरण हनुमंत उगले, तालुका कृषी अधिकारी अशोक रुपचंद वाळके आणि उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय महादेव गोसावी यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्रोत:(dio)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading