अहिल्यानगर, दि.१६:
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शेती, फोटोग्राफी, सर्वेक्षण, सुरक्षा तसेच विविध तांत्रिक क्षेत्रांमध्ये ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. भविष्यातील वाढती गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी पूर्णपणे मोफत ड्रोन ऑपरेटर (पायलट) प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना अधिकृत ड्रोन पायलट परवानाही प्रदान करण्यात येणार आहे.
‘अमृत ड्रोन मिशन’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश ग्रामीण व शहरी भागातील युवकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे. प्रशिक्षण कालावधी १० दिवसांचा असून संपूर्ण प्रशिक्षण मोफत दिले जाणार आहे. तसेच प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांच्या राहण्याची व भोजनाची मोफत व्यवस्था संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. पुणे, नाशिक, मुंबई आणि नागपूर येथे प्रशिक्षण केंद्रांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या प्रशिक्षणानंतर उमेदवारांना अधिकृत ड्रोन पायलट परवाना मिळणार असल्याने शेती, औद्योगिक क्षेत्र, सर्वेक्षण, सुरक्षा सेवा, फोटोग्राफी आदी क्षेत्रांमध्ये करिअरच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत.
इतर कोणत्याही शासकीय संस्था किंवा महामंडळांचा लाभ न मिळणाऱ्या खुल्या प्रवर्गातील २५ जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी, भूमिहार आदी जातींचा समावेश आहे.
अर्जदाराचे कुटुंबीय वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा कमी असावे. उमेदवाराचे वय १८ ते ५५ वर्षांदरम्यान असणे आवश्यक असून किमान १२ वी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. शेतकरी कुटुंबातील उमेदवारांना विशेष प्राधान्य दिले जाणार असून अर्जासोबत वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहणार आहे.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी अमृत जिल्हा कार्यालय, फ्लॅट क्रमांक ०२, वरून अपार्टमेंट, आकाशवाणी केंद्रासमोर, सावेडी, अहिल्यानगर येथे प्रत्यक्ष अथवा ९११२२२८७६९ या भ्रमणध्वनी क्रमांकावर
संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
स्रोत:(dio)
















Leave a Reply