दिनांक १६ मे २०२६ श्रीगोंदा:
घुगलवडगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय सेवा देणाऱ्या मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. भीमरत्न तरुण मंडळाच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व सामाजिक बांधिलकीच्या वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. घुगलवडगावचे तलाठी, ग्रामसेवक तसेच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यानंतर गावातील विविध क्षेत्रात सेवा देणाऱ्या मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पेन देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये तलाठी आशिष आठवले, ग्रामसेवक कांबळे, वायरमन सोहेल इनामदार, आशा सेविका मुक्ता दांगडे व शीतल दांगडे, महिला बचत गटाच्या अध्यक्षा उषा लोखंडे यांच्यासह अनेकांचा समावेश होता.
तसेच श्रीगोंद्याचे निर्भीड पत्रकार म्हणून परिचित असलेले चंदन घोडके तसेच नगर सह्याद्री वृत्तपत्राचे वार्ताहर पत्रकार आप्पासाहेब चव्हाण यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. भूषण ससाणे यांनी आपल्या मनोगतातून सामाजिक ऐक्य व शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
सायंकाळी ज्येष्ठ खंजिरी वादक इंजि. पवन महाराज दवंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित प्रभावी खंजिरी वादन व व्याख्यान सादर केले. त्यांनी गावातील शासकीय सेवेत कार्यरत व्यक्तींचे कौतुक करत युवकांनी जिल्हा पातळीवरील पदांपर्यंत पोहोचण्याचा ध्यास घ्यावा, असे आवाहन केले.
“शिका, संघटित व्हा, संघर्ष करा”, “वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल” असा प्रेरणादायी संदेश देत त्यांनी ग्रामस्थांना शिक्षण व सामाजिक जागृतीचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाला महिलांची लक्षणीय उपस्थिती लाभल्याने त्यांनी महिला वर्गाचेही विशेष कौतुक केले.
यावेळी भीमरत्न तरुण मंडळ घुगलवडगावच्या कार्याचे उपस्थितांनी कौतुक केले. तसेच महसूल सेवक म्हणून कार्यरत असलेल्या मनोज भाऊसाहेब ससाणे यांच्या कार्याचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास माजी सरपंच दत्तात्रय दांगडे, प्रशासक मिलिंद कदम, रमेश ससाणे, युवा प्रमुख महेश पवार, परशुराम चव्हाण, सूरज ससाणे, उपसरपंच रवींद्र गलांडे, प्रविण कांबळे, दिगांबर सुर्यवंशी, छगन इनामदार, नवनाथ लगड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्रोत:(आयोजित कार्यक्रम)
















Leave a Reply