श्रीगोंदा (दिनांक १६ मे २०२६):
श्री संत शेख महंमद महाराज देवस्थानाची वक्फ बोर्डाकडे करण्यात आलेली नोंदणी दोन महिन्यांच्या आत रद्द करण्याचे आदेश धर्मदाय आयुक्तांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आज श्रीगोंदा येथे सद्गुरु संत शेख महंमद महाराज यात्रा कमिटी आणि स्थानिक नागरिकांच्या वतीने घनश्याम अण्णा शेलार यांच्या निवासस्थानी एक महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद घेण्यात आली.

कलम ४१ अ नुसार धर्मदाय आयुक्तांना या प्रकरणात आदेश देण्याचे अधिकार होते. त्यानुसार चौकशी अर्ज क्र. ७६८/२०२५ अंशतः मंजूर करण्यात आला असून, वक्फ बोर्डाकडील नोंदणी (MSBW/-20-/08) रद्द करण्यासाठी दोन महिन्यांत अर्ज सादर करण्याचे निर्देश ट्रस्टच्या विश्वस्तांना देण्यात आले आहेत. न्यासाच्या नावाबाबतचे प्रकरण वरिष्ठ न्यायालयात प्रलंबित असल्याने त्यासंदर्भातील मागणी तुर्तास अमान्य करण्यात आली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना घनश्याम अण्णा शेलार म्हणाले की, संत शेख महंमद महाराजांवर जगातील अनेक तत्ववेत्त्यांनी विचार व्यक्त केले आहेत. मात्र, अमीन शेख यांनी प्रत्येक संशोधकाचे विचार खारीज करून महाराजांचा इतिहास बदलण्याचा घाट घातला होता.

आम्ही न्यायालयात सर्व आवश्यक पुरावे सादर केले. २००८ साली वक्फ बोर्डाकडे हा विषय गेला होता, मात्र समोरच्या बाजूने एकही ठोस कागदपत्र किंवा पुरावा सादर करता आला नाही.
‘मठाधिपती’ हा हिंदू धर्म पद्धतीचा शब्दप्रयोग आहे आणि महाराष्ट्र शासनानेही ‘देवस्थान’ हाच शब्द वापरला आहे. अमीन शेख यांनी देवस्थान बदलून दर्गा करण्याचा व दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. संत शेख महंमद महाराजांनी भागवत आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार-प्रसार केला आहे. आमचा दर्ग्याला विरोध नाही, मात्र महंमद महाराजांचा मूळ इतिहास आहे तसाच स्वीकारला पाहिजे, अशी ठाम भूमिका शेलार यांनी यावेळी मांडली.

यावेळी घनश्याम अण्णा शेलार, गोपाळ मोटे पाटील, पोपट खेतमाळीस, चंदुकाका कटारिया, झुंजरुक तात्या, विवेक काका पालेकर, शेख महंमद महाराज यांचे वंशज शेख, सतीश मखरे, नगरसेवक अनिल महाराज औटी, दादा औटी, अजीम जकाते, बाळासाहेब दुतारे सह नागरिक आणि यात्रा कमिटी सदस्य उपस्थित होते.
स्रोत:(पत्रकार परिषद)
