दिनांक २८ एप्रिल २०२५, श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहरात संत शेख महंमद महाराज यांच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सुरू असलेल्या आंदोलन स्थळी उभारलेला मांडव काढण्यासाठी स्थानिक प्रशासन नोटीस बजावण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.

गेल्या आठ दिवसांहून अधिक काळापासून हे आंदोलन विविध टप्प्यांत सुरू आहे. कीर्तनकार, प्रवचनकार यांच्याद्वारे जनजागृती केली जात आहे, तर गावबंद, आरती, महाआरती अशा स्वरुपात आंदोलनात जोरदार सहभाग दिसून येतो आहे. मात्र, आंदोलनाचा मांडव महसूल व पोलिस कार्यालयाच्या समोरील क्षेत्रात उभारण्यात आला असून, त्यामुळे ध्वनी प्रदूषण वाढल्याची तक्रार प्रशासनाकडे आली आहे.

तसेच या ठिकाणी नुकतेच सुरू करण्यात आलेले पेविंग ब्लॉक बसवण्याचे काम आंदोलनाच्या दिवसापासून थांबले आहे. त्यामुळे विकास कामात अडथळा आल्याची चर्चाही ऐकण्यात येत आहे..

याशिवाय, येत्या १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने शासकीय ध्वजारोहणाचे कार्यक्रम नियोजित आहेत. ध्वजारोहणाच्या ठराविक जागेवर ध्वज संहितेचे पालन करण्यासाठी आंदोलनाचा मांडव अडथळा ठरत असल्याने, तो हटविण्यासाठी प्रशासनाने नोटीस बजावण्याचे संकेत दिले आहेत. तसेच प्रशासकीय कामासाठी येणाऱ्या नागरिकांना व कर्मचाऱ्यांना होणाऱ्या त्रासाबाबतही प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.

दरम्यान, या आंदोलनाला स्थानिक नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, आमदार व खासदार यांचा भरघोस पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून मांडव काढण्याची नोटीस देण्याचे धाडस केले जाईल का.? यावरच सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)


Advertise..
