“जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना ‘राज्यस्तरीय सेवा हक्क पुरस्कार’; अभिप्राय कक्ष उपक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव”..

दिनांक २८ एप्रिल २०२५, अहिल्यानगर/मुंबई:

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या दशकपूर्ती व प्रथम सेवा हक्क दिनानिमित्त सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत शासनाच्या सर्व सेवा ऑनलाईन करण्याचे निर्देश दिले. कोणताही विभाग सेवा ऑनलाईन न केल्यास दर दिवशी प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सध्या अधिनियमाखाली १००० हून अधिक सेवा अधिसूचित असून, त्यापैकी ५८३ सेवा ऑनलाईन दिल्या जात आहेत. उर्वरित सेवा लवकरात लवकर ऑनलाईन कराव्यात. शालेय जीवनात विद्यार्थ्यांना या कायद्याची माहिती देण्यासाठी शिक्षणात समावेश करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसेवा हक्क अधिनियमाला ‘लोकशाहीची गंगोत्री’ असे संबोधले आणि लोकसेवा ही फक्त कायदा नसून उदात्त भावना असल्याचे नमूद केले. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी महाराष्ट्र डिजिटल गव्हर्नन्समध्ये देशासाठी आदर्श मॉडेल ठरेल असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमात वर्ध्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, यवतमाळचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचा त्यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाचे ब्रँड अँबेसिडर म्हणून पद्मश्री शंकर महादेवन व अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची घोषणा करण्यात आली.

राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनु कुमार श्रीवास्तव यांनी आयोगाच्या दहा वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला आणि आगामी उपक्रमांची माहिती दिली.

स्रोत:(जिल्हा माहिती कार्यालय)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading