श्रीगोंदा | २६ फेब्रुवारी २०२६ श्रीगोंदा:
शहराचे आराध्य दैवत संत शेख महंमद बाबा यांच्या यात्रा उत्सवानिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, या आनंदाच्या वातावरणाला खंडणीखोरांच्या कृत्यामुळे गालबोट लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यात्रेनिमित्त राज्यभरातून आलेल्या पाळणा चालकांकडे काही जण पैशांची मागणी करत असून, त्यांना ब्लॅकमेल केले जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते राणा खेतमाळीस यांनी खंडणीखोरांना कडक इशारा दिला असून, प्रसंगी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) धाव घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

संत शेख महंमद बाबांच्या यात्रेसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यभरातून विविध पाळणा चालक आणि मनोरंजनाचे खेळ मांडणारे व्यावसायिक श्रीगोंद्यात दाखल झाले आहेत. हे व्यावसायिक प्रामुख्याने भटक्या-विमुक्त आणि उपेक्षित समुदायातील असून, पोटाची खळगी भरण्यासाठी उन्हातान्हात कष्ट करत आहेत.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून काही ‘कुटील कारस्थानी’ लोक या पाळणा चालकांवर डोळा ठेवून आहेत. तिकीट दर कमी ठेवण्याच्या बहाण्याने किंवा इतर तांत्रिक त्रुटी दाखवून या व्यावसायिकांना ब्लॅकमेल केले जात आहे. सोप्या पद्धतीने पैसे उकळण्याचा हा ‘गोरख धंदा’ शहरात काही जणांनी सुरू केल्याचे निदर्शनास आले आहे.

राणा खेतमाळीस व्यावसायिकांच्या व्यथा मांडताना सांगितले की, भर उन्हात लोखंडी सांगाडे उभे करणे आणि जड अवजारांशी काम करणे हे अत्यंत जोखमीचे काम आहे.
जागेचे भाडे, वाहतूक खर्च (गाडी भाडे), कामगारांची मजुरी आणि रोजंदारी असा मोठा आर्थिक बोजा या व्यावसायिकांवर असतो.

एवढा खर्च करून दोन पैसे कमावण्याच्या आशेने आलेल्या या व्यावसायिकांना विनाकारण त्रास देऊन त्यांची आर्थिक पिळवणूक करण्याचा खंडणीखोरांचा उद्देश आहे.
“राज्यभरातून आपल्या मनोरंजनासाठी आलेले हे बांधव कष्टकरी आहेत. त्यांना त्रास देणाऱ्या खंडणीखोरांनी आता सावध व्हावे. जर ही छळवणूक थांबली नाही, तर आम्ही गप्प बसणार नाही. अशा खंडणीखोरांविरुद्ध आम्ही अँटी करप्शन ब्युरो (ACB), अहमदनगर यांच्याकडे रीतशीर तक्रार दाखल करणार आहोत.”
— राणा खेतमाळीसपाळणा चालकांना धमकावून पैसे वसूल करणाऱ्यांच्या विरोधात आता श्रीगोंद्यात वातावरण तापू लागले आहे. प्रशासनाने आणि पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन यात्रेकरूंच्या आणि व्यावसायिकांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.
स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)
