दिनांक ९ मार्च २०२५,श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहरात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या संत शेख मोहम्मद बाबा यांच्या यात्रा उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. मात्र, या यात्रेतील पाळणे (झोपाळे) अनधिकृतरित्या सुरू करण्यात आल्याने मोठ्या आर्थिक पिळवणुकीसह संभाव्य दुर्घटनेची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी यात्रेत लावण्यात आलेल्या पाळण्यांमुळे होणाऱ्या आर्थिक गैरव्यवहार व सुरक्षेच्या उपाययोजनांच्या अभावावर लक्ष वेधत दोन दिवसांपूर्वी तहसील कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषण केले होते. त्यांनी प्रशासनासमोर विविध मागण्या मांडल्या होत्या, ज्यात तिकीट दर निश्चित करून ते दर्शनी भागात लावणे, सुरक्षेच्या उपाययोजना करणे, अग्निशमन आणि रुग्णवाहिका सेवेसाठी रस्ते मोकळे ठेवणे यांचा समावेश होता.

या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा तहसीलदार क्षितिजा वाघमारे यांनी नगरपरिषद व पोलिस प्रशासनाला योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. आंदोलकांच्या मागणीप्रमाणे तिकीट दर ३० आणि ४० रुपये निश्चित करण्यात आले आणि सुरक्षा नियम पाळण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, या सूचनांकडे श्रीगोंदा नगरपालिकेच्या प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे आरोप होत आहेत.

नगरपालिकेच्या मुख्याधिकारी भगत मॅडम आणि संबंधित अधिकाऱ्यांनी पाळणा चालक व ठेकेदारांना कोणतीही परवानगी दिली नसल्याचे सांगितले जात आहे. तरीही पाळणे बेकायदेशीरपणे सुरू झाले असून, जर यामुळे कोणतीही दुर्घटना घडली, तर जबाबदारी कोण घेणार, असा सवाल नागरिक आणि आंदोलक उपस्थित करत आहेत.

यापूर्वी यात्रेतील ३५ भूखंडधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्यांना परवानगी मिळाली की नाही, याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. स्थानिक नगरपालिका प्रशासनाचे अधिकारी या प्रश्नांवर मौन बाळगत आहेत. त्यामुळे जर यात्रेदरम्यान कोणतीही दुर्घटना किंवा आपत्ती ओढवली, तर श्रीगोंदा तहसीलदार आणि नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, यात्रेतील सुरक्षा आणि भाविकांचे हित जपण्यासाठी ठोस उपाययोजना होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)
