दिनांक १२ जानेवारी २०२६,श्रीगोंदा:
श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आज पार पडलेल्या स्वीकृत नगरसेवक निवडीने शहरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. भाजप प्रणित पॅनेलच्या वतीने अमीन शेख आणि महावीर पटवा यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली.
मात्र, ही निवड होताच शहरात एप्रिल २०२५ मधील त्या गाजलेल्या आंदोलनाच्या आठवणी ताज्या झाल्या असून, ‘कालचे विरोधक आजचे मित्र’ कसे झाले.? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
आजच्या निवड प्रक्रियेत शिवसेनेकडून मनोहर पोटे यांचे नाव चर्चेत होते, मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांना या प्रक्रियेत भाग घेता आला नाही. परिणामी, अमीन शेख आणि महावीर पटवा यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला.

या निवडीमुळे श्रीगोंद्यातील नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे संत शेख महंमद बाबा दर्ग्याचा वाद..! अमीन शेख हे या दर्ग्याचे ट्रस्टी आहेत. एप्रिल २०२५ मध्ये अमीन शेख आणि त्यांच्या कुटुंबाला दर्गा परिसरातून बाहेर काढण्यासाठी स्थानिक राजकारणी आणि हिंदुत्ववादी संघटनांनी मोठे आंदोलन छेडले होते.
संत शेख महंमद महाराज मंदिर जीर्णोद्धारासाठी संपूर्ण श्रीगोंदा शहर बंद ठेवण्यात आले होते. हिंदुत्ववादी संघटनांनी मंदिरात महाआरती करून शेख कुटुंबाच्या ताब्याला विरोध दर्शवला होता.
प्रशासनाच्या तत्कालीन समन्वय बैठकीत आमदार विक्रम पाचपुते यांनी शेख कुटुंबातील प्रतिनिधी उपस्थित राहत नसल्याने, “त्यांना अटक करून आणा,” अशा सूचना प्रशासनाला दिल्या होत्या.
वक्फ बोर्डाकडे असलेली देवस्थानाची नोंद आणि आंदोलनातील तांत्रिक पेचामुळे त्यावेळी राजकारण्यांना माघार घ्यावी लागली होती.

ज्या अमीन शेख यांना दर्गा प्रशासनातून हटवण्यासाठी आमदार विक्रम पाचपुते, माजी आमदार बबनराव पाचपुते आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या समन्वय बैठकीत हजेरी लावली होती, त्यांनाच आता भाजपने सन्मानाने नगरपालिकेत का घेतले? असा प्रश्न सामान्य जनता विचारत आहे.
आंदोलनाद्वारे जे साध्य झाले नाही, ते आता अमीन शेख यांना सोबत घेऊन ‘प्रेमपूर्वक’ मार्गाने साध्य करण्याचा हा प्रयत्न तर नाही ना?
एप्रिलमधील ते तीव्र आंदोलन आणि आजची ही गळाभेट, यातील विरोधाभास श्रीगोंदा शहरात सध्या चांगलाच चघळला जात आहे. भाजपच्या या खेळीमुळे दर्गा आणि मंदिर जीर्णोद्धाराचा प्रश्न सुटणार की अधिक जटील होणार..? हे येणारा काळच ठरवेल.
स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)

