श्री संत शेख महंमद महाराज समाधी मंदिर वादावर तोडगा येणार..?.. १३ ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक…

दिनांक ६ ऑगस्ट २०२५श्रीगोंदा:

राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या सदगुरु संत श्री शेख महंमद महाराज समाधी मंदिराच्या निर्माण कार्यातील अडथळे दूर करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत बुधवार, १३ ऑगस्ट २०२५ रोजी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती समाधी मंदिर निर्माण कृती समितीचे निमंत्रक घनःशाम शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

१९५३ मध्ये “श्री शेख महंमद बुवा देवस्थान, श्रीगोंदा” या नावाने धर्मदाय आयुक्त कार्यालय, अहिल्यानगर येथे नोंदणी करण्यात आली होती. मात्र १९९७ साली श्री अमीन शेख यांनी चेंज रिपोर्ट दाखल करत न्यासाचे नाव बदलून “शेख महंमद बाबा दर्गा ट्रस्ट” असे केले व कोणतीही अधिकृत परवानगी न घेता महाराष्ट्र वक्फ बोर्डाकडे नोंदणी केली. वक्फ बोर्डात केवळ मस्जिद व दर्ग्यांचीच नोंदणी होत असल्याने, येथे असलेल्या समाधी मंदिराचा “मंदिर” हा शब्दच हद्दपार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महाराजांवरील श्रद्धेमुळे हजारो भाविकांनी मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी पाठपुरावा केला. मात्र वक्फ बोर्डाच्या बेकायदेशीर नोंदणीमुळे भव्य समाधी मंदिर उभारणीला अडथळे येत आहेत. त्यामुळे १७ एप्रिल २०२५ रोजी भव्य मोर्चा, २८ एप्रिलपर्यंत धरणे आंदोलन, आणि २४ जुलै रोजी लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. यावेळी सरकारने मध्यस्थी करण्याचे आश्वासन दिल्यामुळे शासकीय व न्यायालयीन मार्गाने प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेण्यात आला.

या पार्श्वभूमीवर दिनांक ५ ऑगस्ट २०२५ रोजी श्री घनश्याम शेलार, आमदार राहुल जगताप, चेअरमन राजेंद्र नागवडे, दत्तात्रय पानसरे, अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब नाहाटा व भगवानराव पाचपुते यांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन या प्रश्नावर बैठक घेण्याची विनंती केली. दादांनी १३ ऑगस्ट रोजी बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे.

पारनेरचे आमदार काशिनाथ दाते सर आणि जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत हे देखील या प्रसंगी उपस्थित होते.

या बैठकीत मंदिराच्या प्रश्नावर निश्चित सकारात्मक तोडगा निघेल, असा विश्वास श्री शेलार यांनी व्यक्त केला आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading