श्रीगोंद्यात ‘प्रवक्ता अकॅडमी स्पोकन इंग्लिश’चा दिमाखदार उद्घाटन सोहळा; ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी संभाषणात पारंगत करण्याचा संकल्प..

दिनांक १९ ऑक्टोबर २०२६,श्रीगोंदा (प्रतिनिधी):

श्रीगोंदा शहरात सामाजिक दृष्टिकोनातून व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदाशिव सोनवणे यांच्या पुढाकाराने ‘प्रवक्ता अकॅडमी स्पोकन इंग्लिश कोचिंग क्लास’चा उद्घाटन सोहळा रविवारी (दि. १८ ऑक्टोबर) मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात आणि दिमाखात पार पडला.

कार्यक्रम पत्रिका

कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या हस्ते झाले, तर अकॅडमीचे उद्घाटन राजेंद्रदादा नागवडे यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रवक्ता अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र पाटील होते. संदीप भोंग सर यांनी निवडीचे अनुमोदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सदाशिव सोनवणे व रवींद्र पाटील यांनी केले.

यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रवक्ता अकॅडमीचे अखिल भारतीय अध्यक्ष रवींद्र पाटील म्हणाले की, “सदाशिव सोनवणे यांनी केवळ व्यावसायिक हेतू न ठेवता सामाजिक जाणिवेतून हा उपक्रम सुरू केला आहे. श्रीगोंद्यातील ही शाखा त्यांनी अत्यंत प्रशस्त व सुसज्ज तयार केली असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचे योगदान देण्याचा त्यांचा प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद व वाखाणण्याजोगा आहे.” श्रीगोंदा तालुक्यातील भावी पिढी घडवण्यासाठी अकॅडमी कटिबद्ध राहील, असे आश्वासन देत त्यांनी अकॅडमीच्या गतिमान शिक्षण पद्धतीची सविस्तर माहिती दिली.

रवींद्र पाटील मनोगत व्यक्त करताना..

माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी ग्रामीण भागात अशा शैक्षणिक उपक्रमांची अत्यंत गरज असून विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन शैक्षणिक क्षेत्रात उज्ज्वल यश संपादन करावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

उपनगराध्यक्ष अलका अनभुले यांनी संचालक सदाशिव सोनवणे हे सेवानिवृत्त अधिकारी व वयाने ज्येष्ठ असतानाही त्यांनी तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी स्पोकन इंग्लिशचे क्षेत्र निवडले, ही बाब भूषणावह असल्याचे सांगितले.

चेअरमन राजेंद्रदादा नागवडे यांनी स्पष्ट केले की, शहराची आधुनिक गरज ओळखून सोनवणे यांनी हे पाऊल उचलले आहे. बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांनी एआय (AI) तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून शिक्षण घेतले पाहिजे. प्रवक्ता अकॅडमीच्या माध्यमातून तालुक्यातील विद्यार्थी नक्कीच प्रगती करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राजेंद्रदादा नागवडे मनोगत व्यक्त करताना..

या प्रसंगी कारखाना संचालक सुभाषकाका शिंदे, नगरसेवक प्रशांत गोरे आणि अकॅडमीच्या कोअर टीमचे सागर वाघ पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त करत उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमादरम्यान उपस्थितांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच प्रवक्ता अकॅडमीचे अधिकृत मान्यता प्रमाणपत्र संस्थापक अध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या हस्ते संचालक सदाशिव सोनवणे यांना सुपूर्त करण्यात आले.

मान्यवरांशी चर्चा करताना सदाशिव सोनवणे व रवींद्र पाटील सर

आपल्या मनोगतात व आभार प्रदर्शनात संचालक सदाशिव सोनवणे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या समस्यांवर बोट ठेवले. ते म्हणाले, “आपण सर्वांनी इयत्ता पाचवीपासून इंग्रजी विषयाचे शिक्षण घेतलेले असले; तरीही अनेकदा स्वतःबद्दल इंग्रजीत पाच मिनिटे बोलताना अडखळायला होते.

आपल्या ग्रामीण भागातील तरुण अत्यंत कष्टकरी आणि गुणी आहेत, मात्र शहरात उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी गेल्यावर भाषेच्या अभावामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो.” त्यांनी पुण्यातील आपले अनुभव सांगताना स्पष्ट केले की, श्रीगोंदा तालुक्यातील विद्यार्थी किंवा नागरिक देश-विदेशात कुठेही गेला तरी त्याला इंग्रजी संभाषणाची अडचण भासू नये, यासाठी प्रवक्ता अकॅडमी शर्थीचे प्रयत्न करेल आणि अकॅडमीचे कार्य उंचीवर घेऊन जाण्याचे आश्वासन देत, उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले.

उद्घाटन प्रसंगी मान्यवर..

दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी अकॅडमीच्या वतीने दोन दिवसांचे फ्री डेमो क्लासेस (Free Demo Class) आयोजित करण्यात आले असून, श्रीगोंदा शहर व तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी आणि पालकांनी या मोफत वर्गांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सदाशिव सोनवणे यांनी केले आहे.

या सोहळ्यास उपनगराध्यक्ष अलका अनभुले, नगरसेवक प्रशांत गोरे, सुभाषकाका शिंदे, राजेंद्र उकांडे, ज्येष्ठ पत्रकार आरिफ भाई शेख, स्वप्नील सोनवणे, सागर पाटील वाघ, निकिता वाघ, कामिनी विलायते मॅडम, अल्ताफ भाई मुजावर, अमोल नागवडे सर, जालिंदर पाडळे सर, भाऊसाहेब खामकर, तोंडे सर, रवींद्र आढाव, कांबळे सर, सांगळे सर यांच्यासह श्रीगोंदा शहरातील नागरिक, शिक्षणप्रेमी आणि बहुसंख्य महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

स्रोत:(आयोजित कार्यक्रम)

Leave a Reply